मुंबई : पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांचे लक्ष आकाशाकडे लागून आहे. अशातच आनंदाची बातमी हवामान खात्याने दिली आहे. राज्यात आगामी ५ दिवसांमध्ये मुसळधार होईल, असा सुधारित अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत ५६ टक्के कमी पाऊस झाल्याचे वास्तव आहे. असे असताना हवामान विभागाकडून पुन्हा आशेचा किरण निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाला जे अपेक्षित वातावरण होते ते आता पश्चिम किनारपट्टीवर तयार झाले आहे. त्यामुळे आगामी ५ दिवसांमध्ये राज्यातील चित्र बदलणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरण असले तरी मुंबई, उपनगरे, ठाणे, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या सरी सुरु आहेत. त्यामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातही पाऊस चांगला सक्रीय झाला असून येत्या ५ दिवसांमध्ये उर्वरीत महाराष्ट्र व्यापणार तर आहेच परंतु आता मान्सून बरसेल असाही दावा करण्यात आला आहे.
राज्यातील १५ जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट दिल्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाला सुरवात होत आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात समाधानकारक पाऊस होत आहे. मात्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर जी अवकृपा राहिलेली आहे ती देखील आगामी ५ दिवसांमध्ये दूर होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.