नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांच्या माहितीनुसार, २ जुलैपासून बांगलादेशमध्ये भारतीय कांद्याची निर्यात सुरळीतपणे सुरू होईल. असे झाल्यास शेतकर्यांना चांगला भाव मिळण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा चांगलाच वांदा झाला आहे. मात्र संकटातही हिंमत न हारता ज्या शेतकर्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे. अशा शेतकर्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. कारण बांगलादेशने भारतातून कांदा आयात करण्यास परवानगी दिली आहे. बांगलादेशने गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय कांद्याची आयात बंद केली होती.
भारत हा कांद्याचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. एकट्या महाराष्ट्रात ४० टक्के कांद्याचे उत्पादन होते. त्यामुळे भावातील चढउताराचा सर्वाधिक परिणाम येथील शेतकर्यांवर दिसून येत आहे. अशा स्थितीत येथील शेतकर्यांना निर्यातीकडून मोठी आशा निर्माण झाली आहे. या निर्यातीमुळे शेतकरी कांद्याचे भाव निश्चितपणे दोन ते चार रुपयांनी वाढू शकतात.