सांगली : शेतकर्यांपुढील संकटांची मालिका संपयाचे नाव घेत नाहीए. अतिवृष्टीतून वाचवलेली द्राक्ष बाजारात विक्रीसाठी तयार असतांना वटवाघळांच्या एका झुंडीने केलेल्या हल्ल्यात तब्बल एक एकरावरील द्राक्षांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण बागच वटवाघळांनी रात्रीच्या वेळी फस्त केली असून वेलीला एकही घड शिक राहिलेला नाही. मिरज तालुक्यातील लिंगणूर येथील एका शेतकर्याचे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे. व्यापार्यांनी चार किलोला ५३० रुपये दर ठरवला असताना वटवाघळांनी बागच फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
लिंगणून तलावाजवळ शंकर माळी यांची एक एकर द्राक्ष बाग आहे. लहरी हवामानात बाग टिकून राहण्यासाठी रात्रीचा दिवस करून बागेतील माल टिकवला. पावसातही फळ वाया जाऊ नये यासाठी दिवसा व रात्री औषध फवारणी करून माल वाया जाणार नाही याची दक्षता घेतली. मात्र एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले आहे.
माल तयार झाल्यानंतर बाजारात पहिल्यांदाच माल येणार म्हणून व्यापार्यांनीही या द्राक्षासाठी ५३० रुपये चार किलोसाठी देण्याची तयारी दर्शवली. दर निश्चिती झाल्यानंतर दिवाळीनंतर माल घेऊन जाण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, हातातोंडाला आलेले द्राक्ष पीक एका रात्रीमध्ये वटवाघळाच्या झुंडीने फस्त केले आहे. द्राक्ष बागेसाठी त्यांनी यासाठी सुमारे १३ लाखांचे विकास सोसायटीचे कर्जही काढले आहे.