नाशिक : दुधी हलवा, दुधीची भाजी किंवा दुधीचे पराठे आपण मोठ्या चवीने खातो. दुधी भोपळा बाजारातून विकत आणण्याऐवजी घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये देखील त्याचे उत्पादन घेणे सहज शक्य आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने घराच्या घरी सेंद्रिय पध्दतीने भाजीपाला पिकवून केमिकलमुळे होणार्या आजारांपासून लांब देखील राहता येवू शकते. तर चला मग आज आपण घरच्या घरी दुधी भोपळ्याची लागवड कशी करायची? याची माहिती जाणून घेणार आहोत.
कृषी विक्रेत्यांकडे अनेक प्रकारच्या फळभाज्यांची बियाणे मिळतात. यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त कृषी विक्रेत्याकडून चांगल्या प्रतीचे दुधी भोपळ्याचे बियाणे खरेदी करा. दुकानातून खरेदी करुन आणलेल्या बियाण्याची थेट लागवड न करता सर्वात आधी ते एक दिवस आधी पाण्यात भिजवून ठेवावे. ज्या मातीत बी पेरायचे आहे ती माती फोडून उन्हात ठेवावी. काही वेळ उन्हात ठेवल्यानंतर त्यात एक मग कंपोस्ट खत टाकून चांगले मिसळा. आता ही माती भांड्यात टाका. यानंतर दुसर्या दिवशी पाण्यातून बिया बाहेर काढून जमिनीच्या आत १-२ इंच दाबून वरून माती व पाणी ओतावे.
बिया उगवण्याआधी रोपाला कडक सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे. बियाणे अंकुरित होईपर्यंत नियमितपणे पाणी आणि खत द्या. वेलीला कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी, कीटकनाशक फवारणी नियमितपणे करत राहणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही लिंबू, बेकिंग सोडा इत्यादींचा स्प्रे बनवू शकता. जेव्हा रोप ३-४ फूट मोठे होते तेव्हा त्याच्या भोवती लाकूड ठेवा आणि त्याला दोरीने बांधा जेणेकरून रोप वाढेल तेव्हा त्याला व्यवस्थित वाढता येईल. साधारणत: सात ते आठ महिन्यात दूधी भोपळ्याचे उत्पादन मिळते.