रत्नागिरी : फळांचा राजा असलेला हापूस आंबा आता स्थानिक बाजारपेठेमध्येही दाखल झाला आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच आंबा बागांवर अवकाळी आणि ढगाळ वातावरणाची अवकृपा राहिलेली आहे. नुकसानीनंतर दरात घट होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण हापूस आंब्याने आपले मार्केट कायम ठेवले आहे. एक डझन हापूससाठी १ हजार २०० ते २ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी पेक्षा यंदा केवळ २५ टक्केच आंब्याचे उत्पादन शेतकर्यांच्या पदरी पडलेले आहे. फेब्रुवारीपासून हापूस आंब्याची मुख्य बाजारपेठेत आवक झाली आहे. शिवाय आता उन्हाचा चटका वाढत असल्याने मागणीही वाढत आहे. मात्र, मुळात उत्पादनात मोठी घट झाल्याने यंदा दर चढेच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्य बाजारपेठानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेतही हापूसची आवक सुरु झाली आहे. रत्नागिरी लगतच असलेल्या पावस गणेशगुळे आणि, गणपतीपुळे इथून स्थानिक बाजारात आंबा दाखल झालाय. पण दर हे २ हजार रुपये डझनच्या घरात असल्याने सर्वसामान्य ग्राहक इच्छा असूनही खरेदी करु शकत नाहीत. आंब्याचे दर कमी होण्यासाठी खवय्यांना मे महिन्याचीच वाट पहावी लागणार आहे.