रत्नागिरी : दिवसेंदिवस तापमान वाढत असून, उष्णतेचा प्रभाव कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवत असून, त्याचा काही प्रमाणात हापूस आंब्यालाही फटका बसत आहे. आंबा बाहेरून तापत असून तो आतून पांढरा होण्याची भीती आहे. यंदा उत्पादन कमी आहे. मुंबईतील वाशीसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये वीस हजार पेटी आंबा ची आवक होत आहे. त्यामुळे दर चढेच आहेत. २५ एप्रिलनंतरच मुबलक हापूस बाजारात दाखल होणार असल्याने सर्वसामान्यांना अजूनही चवीला गोडवा येत नाही.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मोहोराला काही प्रमाणात फळं लागली; परंतु अवकाळी पावसामुळे ती रोगराईत सापडून गळून गेली आहे. यामध्ये मोठा फटका आंबा बागायतदारांना बसलेला आहे. यंदा उत्पादनातही मोठी घट दिसू आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रत्येक महिन्यात बेमोसमी पाऊस येत आहे. काही ठिकाणी हलका पाऊस, ढगाळ वातावरण अशी स्थिती गेल्या आठ दिवसांपासून सुरू होती. याबरोबरच उष्णतेची लाटही कायम आहे. कडकडीत उन्हाचा परिणाम हापूसवर दिसून येतो.
आंबा आतून पांढरा होऊ शकतो. तसेच फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. दर्जेदार फळ शोधून ते बाजारात नेण्याचे आव्हान यंदा आंबा बागायतदारांपुढे येऊन ठेपले आहे. पहिल्या टप्प्यात बाजारपेठेतील आवक कमी असल्याने दर मात्र स्थिरावलेले आहेत. गुढीपाडव्यानंतर वाशीतील पेटींची संख्या लाखाच्या दरम्यान पोहोचते. या वर्षी वाशीमध्ये सध्या २० हजार पेटीच कोकणातून जात आहे. त्यामुळे पाच डझनच्या पेटीचा दर ५ हजार रुपयांपर्यंत आहे. बदलत्या वातावरणामुळे या वर्षी आंबा उत्पादनात मोठी घट झालेली आहे. परिणामी, वाशी बाजारातील आवक अत्यंत कमी आहे. दरही चांगला असून, तो अजून काही दिवस स्थिर राहील. आवक वाढण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. पुढील पंधरवांड्यात हापूस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होऊ शकतो.