हरदोलीची हिरवी मिरची पोहोचली दिल्लीच्या मार्केटमध्ये

- Advertisement -

भंडारा : मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील सेवकराम झंझाड या शेतकऱ्याने भाजीपाला शेतीचा दीर्घ अनुभव व बाजारपेठ, विक्री व्यवस्थेच्या जोरावर भाजीपाला शेती यशस्वी होते, असा कानमंत्र दिला आहे. झंझाड यांची मिरची दिल्ली मार्केटमध्ये पोहोचली असून, या हिरव्या मिरचीला दिल्लीत मागणी वाढली आहे.

थेट व्यापारी शेतावर येऊन मिरची खरेदी करत आहेत.

सेवकराम झंझाड यांच्याकडे वडिलोपार्जित ६ एकर शेती असून, त्यांनी भावाची ६ एकर शेती भाडेतत्त्वावर घेत ७ एकरात भाजीपाला लागवड केली. त्यात ४ एकरावर मिरची, १ एकर टोमॅटो, १ एकर वांगे, १ एकर ढेमस लागवड केला आहे.
यावर्षी जिल्ह्यात मिरचीवर प्रचंड कीडरोग असताना झंझाड यांनी मित्रा फार्मरचे संचालक डॉ. रोपन बांते, डॉ. श्रीकांत शिरसकर, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, ‘आत्मा’च्या प्रतीक्षा बोरकर यांच्या मार्गदर्शनात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले.

पारंपरिक शेतीला फाटा देत सात एकरात मल्चिंग, ठिबकसह शेतात पॅक हाऊस उभारले. शेतीत त्यांना पत्नी सुवर्णा झंझाड, मुलगा स्वप्नील, मजूर सुरज झंझाड, महेश पडोळे, प्रतिमा झंझाड, सुरेखा पडोळे, वैशाली झंझाड, जयतूर डोबणे मदत करत आहेत. आधुनिक शेती ही काळाची गरज असून, ठिबक, मल्चिंगवरील भाजीपाला लागवड फायदेशीर ठरत असल्याचे झंझाड सांगतात. मिरचीतून झंझाड यांना ४ एकरात पहिल्या तोड्यात २०० कट्टे (आठ टन) मिरची निघाली आहे. मिरचीला ५५ रुपये दर मिळाला असून, एकाच तोड्यात ४ लाख ४४ हजार रुपये मिळाले. आणखी मिरचीचे २ तोडे अपेक्षित असून, निव्वळ नफा ५ लाख रुपये मिळणार आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेती केल्यास शेती यशस्वी होऊ शकते, हे झंझाड यांनी दाखवून दिले आहे.

शेतकऱ्यांना खते, कीटकनाशक औषधे सवलतीत मिळण्यासाठी मित्रय, हरदोली सवलतीत मिळण्यासाठी मित्राय फार्मर प्रोडूसर कंपनीच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी गावात कृषी केंद्रही उभारले आहे. मित्राय फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मदतीने कोरोनापूर्वी दुबई, सौदी अरेबियात भेंडी, लवकि, मिरची निर्यात केली. कोरोनानंतर अडचणी वाढल्याने निर्यात बंद झाली. कृषी विभागाच्या नागपूर वनामती येथे आयात निर्यात प्रशिक्षण, पुणे जिल्ह्यात तळेगाव (दाबाडे), बारामतीत फळबाग व भाजीपाला लागवड प्रशिक्षणाचा जास्त फायदा झाल्याचे झंझाड यांनी सांगितले.

तज्ज्ञाच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी हिंमत न हरता आधुनिक शेती करावी. मला मित्राय प्रोड्यूसर कंपनी व कृषी विभागाचे चांगले मार्गदर्शन मिळाले. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेतकरी गटाने एकत्र आल्यास परदेशात भाजीपाला निर्यातीतून अधिक दर मिळविणे सहज शक्य आहे.

हे देखील वाचा :

हे देखील वाचा