मुंबई : पशुपालकांपुढील सर्वात मोठी समस्या म्हणजे जनावरांसाठी लागणारा चारा. राज्यात ज्वारी किंवा मक्याच्या कडब्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र उन्हाळ्यात जानावरांच्या चार्याचा प्रश्न अनेक पशुपालकांसाठी डोकंदुखी ठरत असतो. जनावरांचे पोट भरण्यासाठी साधारणतः ५० ते १०० टक्के वाटा वैरणीचा असतो. ४०० ते ५०० किलो वजनाच्या जनावरांना १ ते १.५ किलो आहार दररोज लागतोच. जनावरांच्या आहारात अचानक बदल करायचे नसतात. हे बदल हळूहळू व कमी प्रमाणात करावा. जुन्या खाद्यात नवीन खाद्ये मिसळून हा बदल ८ ते १२ दिवसात पूर्ण करायचा असतो. जितके जास्त खाद्य तेवढी जास्त ऊर्जा जनावरांना मिळते. यामुळे दुष्काळात वैरणीला पर्याय असणे आवश्यक असते. वैरणीला पर्याय कोणता चारा उपयोगी पडणार आहे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत
ऊसाचा चोथा
साखर कारखान्यातून उरलेला ऊसाचा चोथा रासायनिक प्रक्रियेद्वारा दुष्काळात पर्यायी खादय म्हणून वापरता येतो. रासायनिक प्रक्रिया करताना ऊसाच्या चोथ्यावर ४% कॉस्टीक सोड्याची प्रक्रिया करून जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येतो. वैरणीत ४० ते ६०% ओलावा असेल अशा बेताने ४ ते ६% प्रमाणात युरीया पाण्यात मिसळून हे द्रावण वैरणीवर किंवा ऊसाच्या चोथ्यावर फवारावे व ते खड्ड्यात भरावे. नंतर खड्डा हवा बंद करून ३ आठवडे तसाच ठेवावा. या काळात युरियाचे विघटन होते व अमोनिया वेगळा होऊन वैरणीत मुरतो. अशी प्रकिया भाताचा पेंडा, गव्हाचे कांड, केळींची खुंटे व पाने, जंगली गवतांवर सुद्धा करता येते .
शेंगाची आणि भाताची टरफले
शेंगदाण्याचे तेल काढल्यानंतर राहिलेली टरफले जर ५% मळी सोबत मिसळून बारीक करुन खादय म्हणून वापर केला तर पचनीय प्रथिनांची गरज भागवता येते. भात भरडून त्याच्या टरफलामध्ये ७०% ओलावा व ६०% युरिया मिसळून ते २ महिने मुरु द्यावे. ही मुरलेली टरफले वैरणीच्या ५०% प्रमाणात वापरली तर जनावरांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो .
कोंबड्यांचे खत व गादी खत
पिंजर्यात पाळलेल्या कोंबड्यांचे मलमुत्र, गादीसाठी वापरलेल्या वस्तूत मिसळून जनावरांच्या आहारात उपयोग करता येतो. कोंबड्यांच्या खतात ३०% पर्यंत अशुद्ध प्रथीने असते व त्यातील अर्धे नत्र युरीक आम्लाच्या रुपात आढळते. जनावरे अशुद्ध प्रथिनांपैकी ८०% पर्यंत भाग पचवू शकतो. खतात व गादी खतात खनिजेही पुरेशी असतात असे व गादी खत वाळवून जनावांना खावू घालावे. परंतु हे खत लहान जनावरांना खावू घालू नये.