मुंबई : जून महिन्यात उघडीप दिल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं होते. यामुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, राज्यात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज आधीच वर्तविला होता. त्यानुसार राज्यातील बहुतांश ठिकाणी मागील काही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेती पिकांचे पुन्हा मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
उत्तर महराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातही सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने शेती पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर संततधार पावसामुळे कापूस, मका, खडी, मूग, उडीद, मिरची ही पिके नष्ट झाली असून, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षात पावसाचे पाणी जमिनीत न मुरल्याने पीक पिवळे पडले. धुळे तालुक्यातील तांडा कुंडाणे, वेल्हाणे, हडसुणे आदी गावांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बहरलेल्या पिकात पाणी साचले आहे. त्याचवेळी सततच्या पावसामुळे मिरचीचे पीक कुजल्याने जिल्ह्यात यंदा तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली आहे. सोयाबीनची लागवडही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतकरी अस्वस्थ
राज्यात सध्या झालेल्या पावसाचा काही पिकांना फायदा होत आहे. तर तेच काही पिकांसाठी हानिकारक आहे. सततच्या पावसाचा परिणाम शेती पिकांवर दिसून येत आहे. पिके पिवळी पडल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान, या महिन्यातही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आणखी पावसाच्या शक्यतेने शेतकरी संकटात सापडला आहे. पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडे भरपाईची मागणी करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.