पुणे : यंदा मान्सूचे आगमन वेळेपूर्वीच होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे शेतकर्यांनीही खरिपाचे नियोजन करीत खरीपपूर्व मशागतीची कामे आटोपून घेतली होती. असे असतानाही पावासाने हुलकावणी दिल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उलट गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून तापमानात वाढ झाली आहे. अशात येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवल्याने पुन्हा शेतकर्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
यंदा १ जून नव्हे तर २९ मे रोजी केरळात मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणे अपेक्षित होते. मात्र, ऐन वेळी वार्याची दिशा बदल्याने मान्सून पावसाने हुलकावणी दिली आहे. मान्सूनपूर्व पावसाने कमी अधिक प्रमाणात काही ठिकाणी हजेरी लावली आहे. मात्र अजूनही पेरणीलायक पाऊस न झाल्याने शेतकर्यांच्या मनात संभ्रम आहे. तुर्तास पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने पुन्हा शेतकरी जोमाने तयारीला लागला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मान्सून राज्यात बरसणे अपेक्षित होते. पण राज्यातील तुरळक ठिकाणी मध्यंतरी पावसाने हजेरी लावली होती. तो पाऊसही सध्या गायब झाला आहे. त्यामुळे हंगामपूर्व मशागतीची कामे आटोपून शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे पण अपेक्षित पावासाची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार ४ ते ५ दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली तरी देखील सर्वकाही वेळेत होईल अशी अपेक्षा शेतकर्यांना लागून आहे.