औरंगाबाद : पाण्याचे दुर्भिक्ष, वाळवंटी भूभागाचा मोठा पट्टा, अत्यंत कमी पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीतही इस्त्राईलमध्ये अत्यंत प्रगतीशिल शेती केली जाते. शेती क्षेत्रात इस्त्राईलचे तंत्रज्ञान जगाच्या पाठीवर कुठेच सापडत नाही. इस्राईलमध्ये शेती कशी केली जाते? तेथे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर केला जातो? असे प्रश्न भारतातील शेतकर्यांना पडतात. इस्त्राईलमध्ये शेती व पाण्याचा वापर याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
इस्त्राईलने कृषी क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारीचे मुख्य कारण म्हणजे, त्यांचे नियोजन. इस्राईलने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून कृषी प्रगती साधली आहे. इस्राईलचा शेतकरी १००० लिटर पाण्यापासून ७० रुपये उत्पन्न मिळवितो. पूर्वी त्यांना १००० लिटर पाणी वापरातून १८ रुपयांचे उत्पन्न मिळत होते. सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादन चौपट वाढ झाली आहे. इस्राईलमध्ये पावसाचे पाणी भूगर्भात साठविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते. या साठविलेल्या पाण्यातून देशाची ६० टक्के पाण्याची गरज भागविली जाते.
इस्राईल उपलब्ध पाण्याच्या सुमारे ८० टक्के पाण्यावर पुनर्प्रक्रीया करते. गोड्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो तर सांडपाणी पेयजलाएवढे शुद्ध करून ते शेतीला दिले जाते. आज इस्राईलमधील जवळपास सर्व शेती ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इस्राईलमध्ये पाण्यावर सर्वांचा हक्क असून त्याचे व्यवस्थापन व वितरण ही सरकारची जबाबदारी आहे. दरवर्षी किती पाऊस पडणार आहे आणि पाण्याचा किती साठा शिल्लक आहे. यावरून शेतीला किती पाणी पुरवठा करायचा याचा निर्णय घेण्यात येतो. पाण्याचे मीटर बसवणं सक्तीचे असल्यामुळे कोणालाही पाणी फुकट मिळत नाही.
इस्राईलमध्ये शेतीसाठी लागणार्या पाण्याचा पीक पद्धतीनुसार कोटा ठरवून दिला जातो. ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे शेतकर्यांनी पाणीपुरवठा करणे त्यास बंधनकारक आहे. तथापि, ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी हवे असल्यास शासनाकडे तशी मागणी करावी लागते. शासन पाण्याच्या आवश्यकतेची खात्री करून नेहमीपेक्षा दुप्पट दराने पाणीपुरवठा करते. पाण्याच्या अशा प्रकारे प्रचंड मर्यादा असल्याने प्रत्येक शेतकर्याने नियोजनबद्ध रीतीने ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा पीक प्रकारानुसार १०० टक्के वापर केलेला आहे. प्रत्येक शेतकर्याने आवश्यक शेतावर पाणीपुरवठ्यासाठी स्वयंचलित संगणक बसविला आहे. त्यामुळे शेतीस आवश्यक तेवढे पाणी दिले जाते.
या देशात भूपृष्ठावरील पावसाळ्यात वाहणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून लहान लहान तळी व तलावांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. जर एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर दुष्काळ विचारात घेऊन ते एकूण क्षमतेच्या २५ टक्के पाणी वापरले जाते. इस्राईलमध्ये पुरवठा केलेल्या पाण्यापैकी ६० टक्के पाणी शेतीसाठी, दहा टक्के पाणी उद्योगधंद्यासाठी व ३० टक्के पाणी घरगुती वापरासाठी दिले जाते. पुनर्वापरात आणलेल्या पाण्यातून घरगुती वापर व उद्योगधंद्यांसाठी पाण्यावर सुमारे ७० टक्के प्रक्रिया करून शेतीच्या वापरासाठी दिले जाते. त्यामुळे देशाची एकूण १५ टक्के गरज भागविली जाते.
सिंचन व्यवस्थेकरिता इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक झाडाचे वैशिष्ट्य शोधून काढले आहे. त्याच्या वयोमानाप्रमाणे तसेच जमिनीची प्रत, हवामान या सर्व बाबींचा बाराकाव्याने अभ्यास करून त्या झाडास पाणी किती व कधी लागेल त्या सर्व बाबी ठरविण्यात आल्या. त्याची सर्व माहिती संगणकास पुरवून ठिबक सिंचनाचा संच संगणकास जोडला जातो. ठिबक सिंचनाचा वापर करताना पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या जाडीचाही त्यांनी विचार केला आहे. एखाद्या झाडास साधारणपणे आठ तासात किती पाणी लागते, त्यासाठी किती जाडीचा थेंब व किती वेगाने तो ड्रीपरमधून बाहेर पडावा अशा प्रकारचे त्या ड्रीपरला छिद्र पाडली जातात. ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्रवरूप खते झाडाच्या मुळाजवळच दिली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टाळून त्यांचा योग्य मोबदला मिळतो.
फिल्टरचे तंत्रज्ञान : ठिबक सिंचन पद्धतीमध्ये फिल्टरला अतिशय महत्त्व आहे. इस्राईलमध्ये फिल्टरेशन तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. त्यासाठी त्यांनी दर्जेदार, टिकावू व कार्यक्षम फिल्टर तयार केले आहेत. पाणी कितीही प्रदूषित असले तरी अतिशय वेगाने ते फिल्टरमध्ये आत घेतले जाते. आतील जाड चकत्या वेगाने फिरतात त्यामुळे स्वच्छ पाणी खाली पाइपमध्ये येते व पाण्यातील घाण फेसासारखी वरच्या भागात साठविली जाते व ठराविक वेळेला विरुद्ध दिशेकडून पाण्याचा प्रवाह येऊन घाण व्हॉल्व्हद्वारे बाहेर टाकली जाते व फिल्टर आपोआप साफ केला जातो.
ड्रीपरचा वापर : इस्राईलमध्ये ठिबक संच तयार करता असताना तो सहज, सुलभ वापरायोग्य व कमीत कमी देखभाल लागेल असे तयार केले जातात. पाइपच्या बाहेर ड्रीपर असल्यास ते पाइप शेतात अंथरताना किंवा काढताना मोडण्याची, तुटण्याची शक्यता असते. कारण इस्राईलमध्ये पाइप टाकणे किंवा परत गोळा करणे ही कामे यंत्रामार्फतच केली जातात. याकरिता त्यांनी इनलाईन ड्रीपर पद्धती शोधून काढली आहे. इस्रायली कंपनीने एका विशिष्ट प्रकारच्या ड्रीपरची निर्मिती केली असून पाणी देणे बंद केल्याबरोबर ड्रीपरमधून पाणी बाहेर पडण्याचे थांबते. त्यामुळे पाइपमधीलही पाणी वाया जात नाही किंवा पिकास जास्त दिले जात नाही.