पुणे : मूग व उडीदचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणत घेत असले तरी शेतकर्यांच्या उत्पादनात घट येण्याचे प्रमुख कारण म्हणजे, मूग व उडीद पिकांवर होणार्या विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव! हे संकट टाळण्यासाठी शेतकर्यांनी कशा प्रकार काळजी घ्यावी, याबाबत तज्ञांनी काय सल्ला दिला आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
१) भुरी रोग
हा रोग इरीसीफी पॉलिगोनी या बुरशीमुळे होतो. दमट व कोरडे वातावरण या बुरशीच्या वाढीसाठी पोषक असते. हवेतील आर्द्रता ८० टक्के किंवा त्याहून अधिक असल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. भुरी रोगाचा दुय्यम प्रसार हवेद्वारे होतो.
प्रतिबंधात्मक उपाय : शेत व शेतालगतचा भाग व दुधी सार या तणांपासून मुक्त ठेवावा. रोगास कमी बळी पडणार्या जातींचा (उदा. बीपीएमआर-१४५, बीएम-२००३-०२ मूग वाण) वापर करावा. रासायनिक नियंत्रण – फवारणी (प्रति १० लिटर पाणी), रोगाची लक्षणे दिसताच, पाण्यात मिसळणारे गंधक (८० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १० ग्रॅम किंवा पेनकोनॅझोल (१० टक्के ई.सी.) ५ मि.लि. पुढील फवारणी आवश्यकतेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने बुरशीनाशक बदलून ८ ते १० दिवसांच्या अंतराने करावी.
२) करपा रोग
हा रोग जमिनीतील मायक्रोफोमिना फॅझियोलिना या बुरशीमुळे होतो. रोपावस्थेत असताना खोडावर व पानावर सुरवातीस अनियमित आकाराचे तपकिरी ठिपके दिसतात. हे ठिपके एकमेकांत मिसळून पाने पूर्णपणे करपतात. अशा प्रकारचे ठिपके किंवा चट्टे खोडावर व रोपाच्या शेंड्याकडून खालील भागाकडे जातात. मूळकूज, खोडकूज होऊन रोपे कोलमडतात. रोगग्रस्त झाडे पूर्णपणे वाळतात. पीक फुलोर्यात असताना रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडेमर होऊन पिकाचे मोठे नुकसान होते.
प्रतिबंधात्मक उपाय : पीक काढणीनंतर बुरशी जमिनीत बर्याच काळापर्यंत रोगट झाडाच्या अवशेषांवर जिवंत राहतात. त्यामुळे शेतीतील वनस्पतीचे कुजके अवशेष, रोगट झाडे व रोगाचे अवशेष नष्ट करावेत. शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची फेरपालट करावी. बीजप्रक्रियेमध्ये १.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि १.५ ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे. दाणे भरत असताना पिकावर पाण्याचा ताण पडू देऊ नये.
रासायनिक नियंत्रण : फवारणी प्रति १० लिटर पाणी – रोग दिसताच झायनेब (८० टक्के) २० ग्रॅम किंवा झायरम (८० टक्के) २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के) २० ग्रॅम, पुढील फवारणी रोगाच्या तीव्रतेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने बुरशीनाशक बदलून १० ते १२ दिवसांनी करावी.
३) पिवळा केवडा
हा रोग एलोव्हेनमोझॅक व्हायरस या विषाणूमुळे होतो. या रोगाचे प्रमाण खरिपापेक्षा उन्हाळी हंगामात अधिक असतो. रोगाची सुरवात पानांवर ठळक पिवळसर व फिकट चट्टे एकमेकांशी संलग्न स्वरूपात दिसतात. शेवटी पूर्ण झाड पिवळे पडल्याचे आढळून येते. रोगट झाडास फुले व शेंगा कमी प्रमाणात लागतात.
प्रतिबंधात्मक उपाय : रोगग्रस्त झाडे उपटून वेळेवर किंवा लवकर पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास इमिडाक्लोप्रीड (७० डब्ल्यूएस) प्रतिकिलो ५ मि.लि. याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
४) लीफकर्ल
हा रोग लीफकर्ल विषाणूमुळे होतो. मावा, पांढरी माशी, तुडतुडे या किडींद्वारे याचा प्रसार होतो. मूग या पिकापेक्षा उडीद या पिकावर अधिक प्रादुर्भाव. या रोगाची सुरवात पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेमध्येच आढळून येते. पाने कडापासून खालच्या बाजूस वळतात. पाने वेडीवाकडी होतात, तसेच फुलातील भागाची विकृती होते. अशा झाडांवर शेंगांची संख्या कमी होते. झाडांची वाढ खुंटते. शेंगातील बियांचे वजन घटते. उत्पादनात घट होते.
प्रतिबंधात्मक उपाय : रोग प्रादुर्भाव असलेल्या शेतातील बियाणे पेरणीसाठी वापरू नयेत. पेरणीपूर्वी बियाण्यास इमिडाक्लोप्रीड (७० डब्ल्यूएस) ५ मि.लि. प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रोगट झाडे काढून नष्ट करावीत. रोगप्रतिकारक जातीचा उपयोग करावा. प्रसार रोखण्यासाठी, रसशोषक कीड नियंत्रण करणे आवश्यक. त्यासाठी डायमेथोएट (३० ई.सी.) १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे पेरणीनंतर ३० दिवसांनी फवारणी करावी.
(महाराष्ट्र शासन कृषि विभाग)