औरंगाबाद : तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पंतग, शेंगमाशी, ढेकूण, फुलकिडे, खोडमाशी, पाने गुंडाळणारी अळी, पिठ्या ढेकूण, पट्टेरी भुंगेरे आदी प्रकारच्या कीडरोगांचा प्रादुर्भाव होत असतो. कीडींमुळे उत्पादनात मोठी घट होते, शिवाय उत्पादन खर्चही वाढतो. यासाठी कीडीचे व्यवस्थापान करणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुरीवर पडणार्या कीडींचे व्यवस्थापन कसे करावे? याची तंत्रशुध्द माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
कीडीचे व्यवस्थापन करतांना पेरणीपूर्व काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असते. यासाठी सर्वप्रथम नांगरणी करतांना खोल नांगरणी करावी, शिफारस केलेल्या वाणाचीच योग्य अंतरावर पेरणी करावी, तुरीबरोबर ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन ही आंतरपिके घ्यावीत, वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे, शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणार्या अळीची पर्यायी खाद्यतणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत, पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी ५० ते ६० पक्षीथांबे शेतात लावावेत, जेणेकरून पक्षी अळ्या वेचून खातील, कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी ५ ते ६ कामगंध सापळे लावावेत, जेणेकरून शेंगा पोखरणार्या अळीची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल. या सर्व बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते.
कीड व्यवस्थापन :
एकात्मिक कीड व्यवस्थापनात कीडीस प्रतिकारक्षम अथवा सहनशील वाणाची निवड करणे, मशागतीच्या पद्धती मानवी व यंत्राचा वापर, भौतिक साधनांचा वापर, जैविक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर आदी घटकांचा अंतर्भाव होतो.
या बाबींकडे लक्ष द्या
१) योग्य कुजलेल्या शेणखताचा वापर करा.
२) शेतात कुळवणी करून पालापाचोळा संकलित करून जाळून टाकावा व चांगली मशागत करा.
३) तुरीच्या पिकाची ६०×३० सें.मी. अंतरावर पेरणी करा.
४) शिफारशीप्रमाणे हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरदाची मात्रा पेरणीच्या वेळी द्या.
५) शेंगा पोखरणार्या अळीच्या नियंत्रणासाठी कडूनिंबाच्या ५ % अर्काची फवारणी पीक ५० % फुलोर्यात असताना करावी व दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. कडूनिंबाचा ५ % अर्क तयार करण्यासाठी ५ किलो वाळलेल्या बियांचा चुरा करून एका कापडी पिशवीत बांधून १० लि. पाण्यात रात्रभर भिजू द्यावे. नंतर दुसर्या दिवशी पिळून रस काढून घ्यावा व त्यात ९० लि. पाणी घालून १०० लि. द्रावण तयार करावे. यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा टाकावा व मिश्रण शेंगा पोखरणार्या अळीच्या नियंत्रणासाठी वापरा.
६) ज्या वेळी इतर नियंत्रणाचा उपाय निष्प्रभ करून किडींची संख्या एकदम कमी करणे अनिवार्य असेल, तेव्हाच गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करा.
तुरीवरील रोग व्यवस्थापन
१) मर : पिकाचा दीर्घकालीन फेरपालट अवलंबावा. रोगप्रतिबंधक जाती पेराव्यात. उदा. सी ११, आयसीपीएल ८७११९ (आशा), बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३ व पीकेव्ही तारा इत्यादी. पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
२) वांझ (स्टरीलीटी मोझॅक) : बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३, आशा किंवा पीकेव्ही तारा या वाणांची लागवड करावी. मारोतीहा वाण या रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडतो. कीटकनाशकांद्वारे कोळ्यांचे व्यवस्थापन करावे.
३) खोडावरील करपा : अ) कोलेटोट्रायकम करपा : प्रतिबंधक उपाय म्हणून शेतातील रोगट फांद्या व झाडे जाळून नष्ट करावीत. मॅन्कोझेब हे बुरशीनाशक ३० ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळून रोगाची लागण दिसताच खोड व फांद्यावर फवारणी करावी.
ब) फायटोप्थोरा करपा : रोगग्रस्त शेतात तसेच पाणी साचणार्या जमिनीत पीक घेऊ नये. पेरणीपूर्वी बियाण्यास रिडोमिल एम झेड २ ग्रॅम किंवा एलिएट २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम २ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. या रोगाची रोपावस्थेत तीव्रता आढळल्यास रिडोमिल किंवा एलिएट २ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.