पुणे : सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असून राज्यातील पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. जलसंपदा विभागाच्यावतीने दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण होईल, अशी घोषणाही त्यांनी केली. बालगंधर्व रंगमंदीर येथे जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन व अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव विलास राजपूत, पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह.वि. गुणाले उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, पाणी वापर संस्थाचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासोबतच पाणी वापर संस्था सक्षम होण्यासाठी जलसंपदा विभागाने सुरू केलेली महात्मा फुले पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. राज्यात पाणी वापर संस्थाच्या माध्यमातून पाण्याची सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. गावशिवारातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणांसोबत पाणी वापर संस्थाचाही सहभाग आवश्यक आहे. पाणी वापर संस्थानी गावशिवारात पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम म्हणाले, सिंचन क्षेत्रात पाणी वापर संस्था व अभियंता यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. सिंचन क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव होण्यासोबतच इतरांना प्रेरणा मिळावी यासाठीच ही पुरस्कार योजना आहे. पाणी वापर संस्थांनी सक्षम होण्यासोबतच पाण्याच्या काटेकारे नियोजनात अधिकाधिक सहभाग वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पाणी वापर संस्था व अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला यावेळी जलसंपदा विभागाच्या सर्व खोऱ्यांचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, अधिकारी पाणीवापर संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सिंचन क्षेत्रात लोकसहभाग वाढावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने पाणी वापर संस्था व जलसंपदा विभागातील अधिकारी यांचा समन्वय महत्वाचा आहे. पाण्याचा कार्यक्षमतेने वापर होण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग गरजेचा आहे. जलसंपदा विभागाच्यावतीने प्रोत्साहन म्हणून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी कार्य करणाऱ्या संस्था व गुणवंत अभियंत्याचा पुरस्काराने गौरव करण्यात येतो, यापुढे दरवर्षी 15 सप्टेंबरला पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात येईल.
हे देखील वाचा :