पुणे : भारतात किंवा जगभरात अनेक दिवस साजरे केले जातात. त्यापैकी अनेक दिवस तुम्हीही साजरे करत असाल. मात्र भारतात महिला शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो, हे माहित आहे का? भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महिला शेतकर्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. ग्रामीण विकास, अन्न सुरक्षा, ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन यांमध्ये महिलांचे किती महत्त्व आहे याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रीय महिला शेतकरी दिवसाची घोषणा केली आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेने १८ डिसेंबर २००७ रोजी आपल्या ठराव ६२/१३६ मध्ये १५ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाच्या स्थापनेला मान्यता दिली. हाच दिवस भारतात १५ ऑक्टोबरला महिला शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. एका अहवालानुसार, देशातील सुमारे १२ कोटी महिला थेट शेतीच्या कामाशी संबंधित आहेत. महिलांना साक्षरता, कृषी कौशल्ये, कमी वेतन, कामगार कायद्यांकडे दुर्लक्ष आणि योग्य आरोग्य सेवा यांचा अभाव आहे. शासन वेळोवेळी अनेक योजना आणून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करत असले तरी या योजनांची गावपातळीवर योग्य अंमलबजावणी होत नाही.
राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान दीनदयाल अंत्योदय योजना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने जून २०११ मध्ये सुरू केली होती. या मिशनचे उद्दिष्ट जागतिक बँकेच्या सहाय्याने आणि मदतीद्वारे ग्रामीण महिलांना योग्य शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, रोजगार आणि कृषी कौशल्ये यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. सरकारी नोंदीनुसार, आतापर्यंत सुमारे १.२५ कोटी ग्रामीण महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे.