दुष्काळग्रस्त गाव झाले जलसमृद्ध… वाचा 300 उंबऱ्यांच्या गावाची प्रेरणादाई स्टोरी

- Advertisement -

जालना : जालना जिल्ह्यात सुमारे तीनशे उंबऱ्यांचे गाव म्हणून भराडखेडा (ता. बदनापूर) ची ओळख आहे. सन २०१२ ते २०२६ या काळात गावाने दुष्काळाचे प्रचंड चटके सोसले. शिवारातून वाहणाऱ्या भोरडी नदीला पाणीच येत नसल्याने, टॅंकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा लागत होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना शिवारातील मोसंबी, डाळिंब बागांवर कुऱ्हाड चालवावी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

अशा स्थितीत गावातील प्रगतिशील शेतकरी तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व ‘नाम फाउंडेशन’ चे जिल्हा समन्वयक भाऊसाहेब घुगे यांनी पुढाकार घेत, फाउंडेशनला पाण्याअभावी आपल्या गावाची होत असलेली बीकट परिस्थिती विशद केली. मग चर्चा घडल्या. अपापसांतील मतभेद बाजूला ठेवून गावकरी एक झाले. भोरडी नदी रुंदी- खोलीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आणि संपूर्ण गाव शिवार जलसमृद्ध झाले.

आणि सुरू झाली पाणीटंचाई मुक्ती
भोरडी नदी पुनरुज्जीवनात भगवानराव बारगाजे यांच्या समन्वयातून आनंदनगरी व सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाचे सहकार्य मिळाले. त्यातून सात किलोमीटर नदीचे रुंदी- खोलीकरण, बांधबंदिस्ती काम पूर्णत्वास गेले. गावकऱ्यांच्या कष्टाला फळ आले आणि झालेल्या पावसाने नदी दुथडी भरून वाहू लागली. हात पाणी साठून आसपासच्या जलस्रोतांचा स्तर वाढण्यास मदत झाली. बांधबंदिस्ती यातूनही पाणी उपलब्धता वाढण्यास मदत झाली. कृषी विभागाच्या योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या लहान- मोठ्या ४५ शेततळ्यांनीही हातभार लावला. त्यातून पिकांना संरक्षित पाणी देण्याची सुविधा तयार झाली. पाणी उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱयांनी त्याचे योग्य नियोजन करीत, पाणी साठवणूक करण्यास सुरूवात केली. आज, गावातील एकूण ७०२ हेक्‍टरपैकी ४१० हेक्‍टर क्षेत्र ठिबकखाली आले आहे.

पीकपद्धतीतरही केला बदल
सुमारे ७०२ हेक्‍टरचा शिवार असलेल्या भराडखेडा गावातील शेतकरी पारंपरिक खरीप व रब्बी पिके घेत होतो. परंतु, शेतकऱयांनी विचारविनीयम करून, त्यात बदल करीत, पीकपद्धतीत बदल केला. शिवारात आता २२० हेक्‍टरवर फळबागा असून त्यात ३० हेक्‍टर डाळिंब, १०० हेक्‍टर मोसंबी, ४० हेक्‍टर आंबा तर कांदा, टोमॅटो, कारली मिरची आदी बीजोत्पादनाचे सुमारे ५० एकर क्षेत्र आहे. बालाजी व प्रकाश हे शिंदे बंधू २०१० पासून संरक्षित शेतीची कास धरत थेट कंपन्यांशी करार करीत शेडनेटमध्ये टोमॅटो, कारली, मिरचीचे बीजोत्पादन घेतले.  प्रगतिशील शेतकरी भानुदास घुगे यांनी ब्राझीलच्या सीडलेस मोसंबी वाणाचा पाच एकरांत नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. गुजरातमधील कच्छवरून आणलेल्या खजुराची ३२५ रोपे लावली.  केसर व गावरान आंबाही गावातील शिवारात निघत आहे. प्रत्येकी सव्वादोन एकरांची दोन शेततळी आहेत. काही अंतरावरील राजेवाडी तलावावरून पाइपलाइनने पाणी आणले आहे.  

शेतकरी कंपनीची स्थापना
भराडखेडा व बदनापूर तालुक्‍यातील गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत रामदास बारगाजे यांच्या पुढाकारातून २०१९ मध्ये ‘ॲग्रोबोर्ड फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना केली आहे. सुमारे ३०० सभासद असून सौ. सुशीला रामदास बारगाजे अध्यक्षा आहेत. ७५ टक्‍के सभासद मोसंबी उत्पादक आहेत. साहजिकच क्लिनिंग, ग्रेडिंग व वॅक्सिंग युनिट उभारणीसाठी कंपनीचे प्रयत्न आहेत. परिसरात वाढलेले सीताफळ, पेरू, जांभळाचे क्षेत्र पाहता  प्रक्रिया युनिटची उभारणी करण्याचा मानस आहे. गावातच नाथ ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी देखील भाऊसाहेब घुगे यांच्या नेतृत्वात मागील वर्षी स्थापन करण्यात आली आहे.

हे देखील वाचा