औरंगाबाद : केंद्र सरकार सेंद्रिय शेतीवर भर देतांना दिसत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले आहे. कारण रासायनिक खतांच्या अतिवापराने शेतीतील उत्पादन क्षमता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. हे करत असतांना पीक पद्धतीमध्ये बदल करून खरीप, रब्बी, उन्हाळी आणि बारमाही अशा चार प्रकारात शेती केल्यास त्याचे फायदे मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
रासायनिक खतांच्या अति वापराने जमिनीतील पीएच वाढत चालला आहे. परिणामी पिकांची उत्पादन क्षमता कमी होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. यासाठी रासायनिक खतांचा कमी वापर करणे आवश्यक आहे. सोबतच पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. जमिनीत जादा पाण्याच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात क्षार वाढतात. यासाठी वर्षभरात जे पीक घेतो त्या हंगामाचे चार भाग करावेत. या चार हंगामांमध्ये म्हणजेच खरीप, रब्बी, उन्हाळी आणि बारमाही अशा पद्धतीने शेती करावी.
चार हंगामामध्ये दरवर्षी पीक बदल करणे आवश्यक आहे. शेतामध्ये एकदल व द्विदल पिके घ्यावी. एकदल वर एकदल पीक चालत नाही, जे द्विदल वर्गीय पिकात चालते. पीक बदल केल्याने उत्पादन क्षमता वाढण्यास मदतच होते. मक्याचे पीक दरवर्षी घेऊ नये तर ते चार वर्षांनी एकदा घेतले तरी चालते. सूर्यफुलाचे पीक घेतले तर जमिनीमधील चिकटपणा कमी होण्यास निश्चितच मदत होते. म्हणून ही पिके अधून-मधून घेणे गरजेचे आहे.