जालना : महाराष्ट्रात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्याची फलश्रुती म्हणून राज्याचे यंदाचे रेशीम कोष उत्पादन ३३५६ टन झाले आहे. महाराष्ट्राचा बायव्होल्टाइन रेशीम कोष उत्पादक राज्य म्हणून नावलौकीक झाला आहे. १०० टक्के बायव्होल्टाइन रेशीम कोष उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होते आहे. यात मराठवाड्याचा वाटा मोठा आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याने केवळ रेशीम कोषचे उत्पादन न घेता कोष ते कापडनिर्मितीसाठी ठोस पाऊले उचलली आहेत. याच अनुषंगाने जालना येथे स्वतंत्र रेशीम कोष बाजारपेठ इमारत उभारण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ मध्ये जालना येथे रामनगरमच्या धर्तीवर मिनी रेशीम कोष बाजरपेठेच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. जवळपास ६ कोटी १३ लाख रुपये खर्चून तयार करण्यात येणार्या या स्वतंत्र बाजारपेठेच्या इमारतीत रेशीम कोष खरेदी विक्री हॉल, व्यापार्यांना कोष साठविणे व राहण्याची सुविधा, कँटीनची सोय, प्रशिक्षण हॉल, प्रशासकीय कार्यालय, ऑटोमॅटिक ड्रॉइंग युनिट, ककुन टेस्टिंग युनिट आदी अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. ा इमारतीचे बांधकाम जवळपास अंतिम टप्प्यात आहे.
रेशीम कोष बाजारपेठेची स्वतंत्र इमारत पूर्ण झाल्यास बाजारपेठ, इनक्युबेशन सेंटर, अंडीपुंज निर्मिती, चॉकी, बायव्होल्टाइन कोष उत्पादन, दोन ऑटोमॅटिक रेलिंग युनिट आदी टप्पे जालना जिल्ह्यात पूर्ण होतील. याशिवाय निर्मित धाग्याला पिळ देणे, रंग देणे व त्यानंतर वस्त्रनिर्मिती करणे आदी कामे येत्या दोन वर्षांत पूर्णत्वास जातील, अशी अपेक्षा आहे.