पुणे : इस्त्राईलमध्ये अत्याधुनिक पध्दतीने शेती केली जाते, हे आपणा सर्वांना माहित आहेच. मात्र केनियातही तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती केली जात आहे. केनियामध्ये केल्या जाणार्या शेतीला अॅग्रिव्होल्टाईक्स असे म्हटले जाते. यात वीज व पाण्याची बचत तर होतेच शिवाय शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होते. अशा प्रकारची शेती आता भारतातही होवू लागली असून या नाविन्यपूर्ण शेतीतंत्राची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
कृषी क्षेत्रात विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील आणि जगातील शेतकरी पारंपारिक शेतीसोबतच नाविन्यपूर्णतेवर भर देत आहेत. कमी संसाधनांमध्ये चांगले उत्पन्न मिळवून देणारे कृषी-उत्पादनासाठी असे मॉडेल विकसित केले जात आहेत. असेच एक तंत्र केनियात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. केनियातील शेतकरी उंचावर असलेल्या संपूर्ण शेतात सौर पॅनल बसवतात. व त्याखाली बागायती पिकं घेतात. यातून सौर ऊर्जा निर्मिती केली जाते तसेच पावसाचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते. या तंत्राला अॅग्रिव्होल्टाईक्स असे म्हटले जाते. अशा प्रकारे एकाच जमिनीवर वीज आणि भाजीपाला लागवड एकाच वेळी होत आहे. शेतीच्या या मॉडेलमुळे पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
या मॉडेलबद्दल संशोधकांचे म्हणणे आहे की सौर पॅनेलच्या सावलीत झाडे आणि मातीची आर्द्रता राखली जाते, तसेच उन्हाळ्याच्या हंगामात उच्च तापमानामुळे झाडे जळण्याचा धोकाही कमी होतो. आज फलोत्पादनासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेल्या केनियानेही अॅग्रिव्होल्टाईक्सच्या मदतीने उत्कृष्ट परिणाम दिले आहेत. आज अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी सारख्या विकसित देशांनी कृषी व फलोत्पादनाच्या क्षेत्रात अॅग्रीव्होल्टाईक्सच्या सहाय्याने बरीच प्रगती केली आहे.
भारतातही उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लहान-लहान ऍग्रीव्होल्टिक्स फार्म विकसित केले जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर आणि सीतापूरसारख्या उष्ण भागातील शेतकर्यांनी अॅग्रीव्होल्टिक्स मॉडेल स्थापित केले आहे. या मॉडेलने राजस्थानच्या शेतकर्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळवून दिले आहे. याठिकाणी सोलार पॅनलच्या सहाय्याने रखरखत्या उन्हामुळे शेती करताना शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.