मुंबई : जून महिन्याला संपायला अवघे १० दिवस शिल्लक असतांना अजूनही दमदार पाऊस न बरसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. पावसाच्या या लहरीपणाचा परिणाम आता खरीप हंगामावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गतवर्षीच्या तुलनेत देशात तब्बल २२ टक्के पेरणीत घट झाली आहे. पहिल्या टप्प्यात पेरले जाणार्या कडधान्यात ४० ते ४५ टक्के घट झाली आहे.
मान्सून दरवर्षीपेक्षा तीन दिवस आगोदर देशात दाखल झाला खरा पण तो सक्रीयच झाला नसल्याने खरिपातील पेरण्या रखडल्या आहेत. कृषी विभागाने खरिपातील पेरणीची आकडेवारी जाहीर केली असून यामध्ये ही बाब समोर आली आहे. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या धान पिकावरच मोठा परिणाम झाला आहे. गतवर्षी जूनच्या दुसर्या आठवड्यापर्यंत केवळ ६५ हजार हेक्टर क्षेत्रफळावर धान पिकाचा पेरा झाला होता. यंदा हेच प्रमाण ६४ हजारावर आहे. गतवर्षी आतापर्यंत कडधान्याचा पेरा हा ०.२७ लाख हेक्टर क्षेत्रफळावर होता. यंदा तो ०.२० लाख हेक्टर क्षेत्रफळावर झाला आहे. गतवषी मक्याची ०.३४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती ती आता ०.२५ लाख हेक्टर क्षेत्रापुरता मर्यादित झाली आहे. तेलबिया ०.१९ लाख हेक्टरवरुन ०.१३ लाख हेक्टर क्षेत्रफळापर्यंत खाली आल्या आहेत.
आता २० जून उलटला तरी पाऊस नाही. हीच परिस्थिती अजून काही दिवस राहिल्यास शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते, अशी भीत कृषी तज्ञांना सतावू लागली आहे. आधीच दोन वर्षांपासून एकही हंगाम शेतकर्यांच्या हाती आलेला नाही. यंदा कापूस व सोयाबीनला चांगले दर मिळाले म्हणून शेतकर्यांचे नुकसान काही प्रमाणात भरुन निघाले. मात्र आता हा हंगाम जर हातातून गेला तर परिस्थिती आणखीणच बिकट होवू शकते.