Khas Grass : अधुनिक शेतीची जेंव्हा चर्चा होते तेंव्हा पारंपारिक पिकांव्यतिरीक्त अन्य मार्गातून उत्पन्नाचे मार्ग शोधले जातात. या वेगळ्या वाटेवरील शेतीत वाळा (खस) लागवडीचाही समावेश होतो. वाळा (खस) हे भारतीय वंशाचे बारमाही गवत आहे. वाळा (खस) हे एक कडक गवत आहे जे दुष्काळी परिस्थिती आणि पाणी साचणे दोन्ही सहन करू शकते. त्याची लागवड विविध प्रकारच्या मातीत जसे की, पडीक जमीन, बुडीत जमीन, क्षार युक्त माती, खडबडीत, खड्डेमय क्षेत्र आणि रेताड जमीन अशा विविध प्रकारच्या जमिनीत सहजपणे घेता येते.
वाळा हे बहुवार्षिक गवत एक ते दोन मीटर उंच वाढते. याला भरपूर तंतू-मुळे असतात ती अतिशय खोलवर गेलेली असतात. मुळे सुवासिक असतात. पाने गवतासारखी, ३० ते ९० सें. मी. लांब असून, रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत व कडांना कुसळे असतात. हलक्या ते भारी जमिनीमध्ये लागवड करता येते. तांबड्या व गाळाच्या जमिनीत मुळांची चांगली वाढ होते. फिकट पिवळ्या किंवा तपकिरी लाल रंगाची मुळे सुगंधी तेल उत्पादनासाठी उत्कृष्ट मानली जातात.
वाळा गवताच्या मुळांमध्ये एक सुगंधी तेल आढळते, जो एक प्रकारचा अत्तर आहे. याच्या तेलापासून व्हेट्रीव्हेरॉल, वेट्रीव्हेरॉन आणि वेट्रीव्हेरील एसीटेट नावाची सुगंधी रसायने तयार केली जातात. त्यापासून मिळणारे तेल अत्तर, साबण, शरबत, पान मसाला, खाद्य तंबाखू आणि अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. हे तेल अन्य सुगंधी तेलांबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते. वाळ्याची मुळे चटया, पंखे, टोपल्या बनविण्यासाठी वापरतात. उन्हाळ्यात वाळ्याच्या पिशव्या तयार करून कूलरमध्ये ठेवल्या जातात आणि खिडकीच्या दारात पडदे लटकवले जातात. जेव्हा पाणी पडते किंवा शिंपडले जाते तेव्हा थंड आणि सुगंधित हवा देते. आपल्याकडे वाळ्याला पिण्याच्या पाण्यात टाकले जाते, त्यामुळे पाणी थंठ व आरोग्यसाठी फायदेशीर होते.
जगात खसपासून सुमारे ३०० टन उत्पादन घेतले जाते. त्यापैकी केवळ २०-२५ टन तेल भारतात तयार होते. आपल्या देशात राजस्थान, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये खसाची लागवड केली जाते, ज्यातून केवळ २०-२५ टन तेल तयार होते. यामुळे खसच्या शेतीला प्रचंड वाव आहे. पडीक जमिनीवर आणि शेताच्या बांधावर खस गवताची लागवड करून कमाई करता येवू शकते. ग्रामीण तरुणांसाठी खस लागवड आणि तेल गाळणे हा उत्तम रोजगार आणि उत्पन्न मिळवण्याचा सुवर्ण व्यवसाय ठरू शकतो.
अशी करा वाळ्याची लागवड
बागायती भागात, वाळ्याची लागवड फेब्रुवारी ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत करता येते, परंतु चांगल्या उत्पादनासाठी जुलै ते ऑगस्ट हा सर्वोत्तम काळ आहे. एप्रिल-मे महिन्यात रोपवाटिकेत बियाण्यापासून रोपे तयार केली जातात आणि दोन महिन्यांनी तयार रोपे मुख्य शेतात लावली जातात. यासाठी ६० ते ७५ सें. मी. अंतरावर सरी- वरंबे किंवा जमिनीचा उतार व मगदुरानुसार योग्य आकाराचे (२ बाय ४ मीटर) सपाट वाफे तयार करावेत. ७५ बाय ३० सें. मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी एका वर्षाच्या गवतापासून आलेले फुटवे वापरावेत. साधारणपणे १८ ते २० महिन्यांत वाळ्याची तोडणी केली जाते. पूर्ण विकसित मुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत उत्खनन करुन काढता येतात. खोदण्यापूर्वी झाडांचा वरचा भाग विळ्याने कापला जातो. या पाल्याचा वापर चारा, टोपल्या, इंधन किंवा झोपड्या बनवण्यासाठी केला जातो. वरच्या भागाची कापणी केल्यानंतर मुळे खोदली जातात. लागवडीसाठी के. एस.- १, के. एस.- २ व सुगंधा या जाती निवडाव्यात. (अधिक माहितीसाठी संपर्क : ०२४२६ – २४३२९२ औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
२५ ते ३० हजार रुपये प्रति किलो दर
वाळा गवताच्या तेल उत्पादनाचे प्रमाण लावणीची वेळ, विविधता, हवामान आणि पीक व्यवस्थापन यावर अवलंबून असते. सुपीक चिकणमाती आणि वालुकामय चिकणमाती जमिनीत लागवड केलेल्या खुस गवताच्या सुधारित जाती ३५-४० क्विंटल ताजी मुळे देतात, जी सावलीत वाळल्यानंतर आधुनिक ऊर्धपातन पद्धतीने २०-३० किलो तेल मिळवू शकतात. मध्यम सुपीक वालुकामय जमिनीतून २५-३० क्विंटल मुळे मिळवता येतात आणि त्यापासून १५-२५ किलो सुगंधी तेल मिळू शकते. बुडीत आणि समस्याग्रस्त जमिनींमध्ये खुस गवत आणि तेलाचे उत्पादन कमी होते. त्याच्या मुळांमध्ये ०.६ ते ०.८ टक्के तेल असते. वाळ्याचे तेल २५ ते ३० हजार रुपये किलो दराने बाजारात विकले जाते. तेल काढल्यानंतर खसखसच्या रोपाचा वरचा भाग आणि त्याची मुळे विकून अतिरिक्त नफा मिळवता येतो.