नंदुरबार : सध्या मिरची हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीच्या भावामध्ये चांगल्या प्रकारची तेजी आली आहे. नंदुरबारला लाल मिरचीला ७ हजार रुपयांचा भाव मिळत आहे तर कोरडी लाल मिरचीने १६ हजारांचा टप्पा पार केला आहे. मात्र तेलंगणातील अनुममुला बाजारपेठेत लाल मिरचीला तब्बल २५ हजार रुपये क्विंटलचा विक्रमी दर मिळत आहे.
तेलंगणात लाल मिरचीची संपूर्ण काढणी अजून सुरू झालेली नाही. याच परस्थितीचा फायदा इतर भागातील शेतकरी घेत आहेत. पुढील काही दिवस लाल मिरचीचे भाव चढेच राहतील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. तेजा मिरचीही तेजीत आहे. कारण या वाणाच्या मिरचीलाही १६ हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. वारंगलच्या बाजारात लाल मिरचीच्या ‘यूएस ३४१’ या प्रीमियम वाणाचा भाव २५ हजार रुपये आहे जो विक्रमी मानला जात आहे.
मिरचीच्या वाणाप्रमाणे सध्या बाजारात दर आहेत. त्याप्रमाणे तेजा मिरचीला १६ हजार ते १८ हजार ८०० पर्यंतचा दर आहे. त्याचबरोबर वंडर हॉट वाणाच्या मिरचीला १७ हजार ते २२ हजार ५०० रुपये किंमतीला विक्री होत आहे. लाल मिरचीच्या १०४८ वाणांला १६ हजार ते १९ हजार रुपये क्विंटल तर ‘३४४’ वाणांचा भाव १५ ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर टोमॅटोच्या आकारातील लाल मिरचीला क्विंटलमागे २२ ते २५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या वर्षी याच वेळी या वाणाची किंमत १३ ते १६ हजारांच्या दरम्यान होती.
हे देखील वाचा :