जळगाव : कपाशी पिकावर रसशोषक किडी व बोंड अळ्यांचा नायनाट करण्यासाठी शेतकरी फवारण्या करीत आहे. शेतात कीटकनाशकांची फवारणी करतांना शेतकर्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. सतत कीटकनाशकांचा संपर्क आल्यास अशा व्यक्तीला त्वचेची अॅलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. शिवाय विषारी कीटकनाशके तोंडात गेल्यास एखाद्याचा मृत्यू देखील होवू शकतो. म्हणून शेतकर्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता असते.
फवारणी करताना अशा पध्दतीने घ्यावी काळजी
१) कीटकनाशके नामांकित कंपनीकडून खरेदी करावीत.
२) कीटकनाशके लहान मुलांपासून दूर ठेवावीत.
३) तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये.
४) शिफारसीत कीटकनाशकाची मात्रा फवरणीसाठी मोजून घ्यावी.
५) फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्क इत्यादींचा वापर करावा.
६) हवेच्या दिशेने फवारणी करावी. फवारणी सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी करावी.
७) पंपाच्या नोझलमधील कचरा तोंडाने फुंकून काढू नये.
८) कीटकनशकांचा शरीराशी सरळ संपर्क आल्यास पाण्याने स्वच्छ धुवावे.
९) फवारणीचे द्रावण बनविण्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ किंवा पिण्याचे पाणी ठेवू नये.
१०) खाद्यपदार्थ, तंबाखू किंवा बिडी ओढण्यापूर्वी तोंड, हात व पाय पाण्याने स्वच्छ धुवावेत.
११) फवारणी संपल्यावर आंघोळ करावी व कपडे स्वच्छ धुवावेत.
याकडे ठेवा विशेष लक्ष
प्लॅस्टिकच्या बादलीत कीटकनाशकाची आवश्यक ती मात्रा पाण्यामधे घेऊन चांगले काठीने ढवळून एकजीव मिश्रण तयार करावे व नंतर हे मिश्रण आवश्यक असलेल्या क्षेत्रासाठी पाण्यामधे मिसळून फवारणीचे द्रावण तयार करावे. फवारणी पंपामधून सर्वसाधारण मध्यम आकाराचे (१०० ते ३००मायक्रॉन) थेंब पडतात. मध्यम आकाराचे थेंब फवारणीसाठी योग्य आहेत. यापेक्षा लहान आकाराच्या थेंब फवारल्यानंतर पिकावर योग्य त्या ठिकाणी पडण्यापूर्वीच ते वार्याने इतरत्र जाण्याची शक्यता असते तर मोठ्या आकाराच्या थेंबामुळे चांगले कव्हरेज मिळणार नाही. उलट दोन चार थेंब एकत्र येऊन पानावरून खाली घसरून पडतील व त्यासोबत कीटकनाशक सुद्धा खाली पडेल. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वांत विषारी असतात. त्यानंतर पिवळा, निळा वहिरवा असा क्रम लागतो. ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तींना समजण्यासाठी असतात. म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीतकमी विषारी असतात. फारच आवश्यकता असल्यास डब्यावर लाल रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके वापरावीत.