पुणे : महाराष्ट्रात लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये सध्या लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि दिल्ली या राज्यानंतर महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात हा त्वचा रोगाचा पादूर्भाव झाला आहे.
संपूर्ण राज्यात ८५० जनावरांना लम्पीने ग्रासले आहे, त्यापैकी आतापर्यंत ५९० जनावरे बरी झाली असून उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर संपूर्ण राज्यात आतापर्यंत १० जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे पशुपालक सध्या चिंतेत आहेत. राज्यात लसीकरण करण्यात येतंय. तरीही लम्पी आटोक्यात आणण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागासमोर आहे.
असा होतो रोगप्रसार
या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणार्या माश्या, डास, गोचिड, चिलटे यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १- २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होतो. त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (३५ दिवस) जिवंत राहू शकतात. विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.
ही आहेत लम्पी आजाराची लक्षणे
1) या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
2) लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो.
3) जनावरे चारा खाणे, पाणी पिण्यास कमी होतात.
4) हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात.
5) डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
6) पायावर तसेच कानामागे सूज येते.
7) जनावरे दूध देण्यास कमी पडतात.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी?
1) लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
2) जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
3) निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
4) गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये.
5) लक्षणे आढळल्यास तातडीने पशुवैद्यकांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.
6) बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
7) बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी ८ ते ९ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.