मुंबई : राज्यात मान्सून लांबणीवर (Maharashtra monsoon) पडणार अशी चर्चा सुरु असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (imd) या सगळ्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून (Maharashtra) राज्यामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून कोणताही विलंब न करता प्रगती करत आहे आणि येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात पोहोचेल, असे सांगण्यात आले आहे.
पुढच्या ४८ तासांमध्ये मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भागात मान्सून पुढे सरकरण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यात मान्सूनचं आगमन होईल.
गेल्या काही दिवासांपासून वातावरणात बदल झाला असून ठिकठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मशागत झालेल्या शेत जमिनीसाठी या पावसाचा फायदा झाला आहे. खरिपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून आता समाधानकारक पाऊस झाला की, शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्यास सज्ज राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचे आगमन आणि पेरणीला घेऊन शेतकरी संभ्रमाात होता. पण आता दोन दिवसांमध्ये आगमन झाल्यास सर्वकाही वेळेवर होणार आहे.