पुणे : राज्यात गत आठवड्यापासून संततधार सुरु असून मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहणार असून रायगड, रत्नागिरी, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि गडचिरोलीला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गत आठवडाभरापासून होत असलेल्या संततधारेमुळे राज्यात अनेक ठिकाणी पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. काही भागांमध्ये अती पावसामुळे शेतजमीन खरडवली गेली आहे. शेतात पाणी साचल्यामुळे पिके सडू लागले आहेत. आता हवामान खात्याने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पुढील काही दिवस पुन्हा तशीच परिस्थिती कायम राहण्याची दाट शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १२ आणि १३ तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाभरात पावसाचा जोर कायम असून धरणांमधून विसर्ग सुरू झालाय. गोदावरी नदीला मोसमातील पहिला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय.
धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलपाडा धरणातून दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर नवापूर तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन,नदी काठावरील. गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.