अति ऊन, विजेअभावी पीकांचे मोठे नुकसान….शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

- Advertisement -

यवतमाळ : काळी दौलत खान येथील (कै.) सुधाकरराव नाईक जलसागर प्रकल्प परिसरात असलेल्या रोहित्रावरून वीजपुरवठ्याची मागणी वाढली आहे. परिणामी, कमी क्षमतेचे असलेले रोहित्र आठवडाभरात तीन वेळा जळाले. याच्या त्यामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी पिके धोक्यात आल्याने या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सुधाकरराव नाईक जलसागर प्रकल्पातून शेतकरी पाण्याचा उपसा करतात. याच पाण्यावर काळी दौलत खान परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, कलिंगड, भुईमूग, तीळ यासारख्या पिकांची लागवड केली आहे.

सध्या उष्णतेचा पारा ४४ अंशांच्या पुढे गेल्याने शेतातील पिकांना पाण्याची गरज आहे. अशावेळी विजेची उपलब्धता आवश्यक असताना वीज कंपनीच्या उलट्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सिंचन प्रकल्पाच्या परिसरात वीज वितरण कंपनीकडून ६३ केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात आले आहे. मात्र विजेची मागणी वाढल्याने आठवडाभरात तीन वेळा हे रोहित्र जळाले. रोहित्र जळाल्यानंतर वीज वितरण कंपनीकडून ते बदलण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके करपून गेली. संपूर्ण उन्हाळी हंगामात यामुळे वाया गेल्याने शेतकरी नैराश्यात गेले आहेत. सिंचन प्रकल्पात पाणी असताना वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शासनाने वेळीच या प्रकाराची दखल घेत ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी केली आहे. उपविभागीय कार्यकारी अभियंता आडे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी सुधाकर टेमकर, घेमासिंग जाधव, अरुण कुलदीपके, नंदा टेमकर, किसना अढाव, प्रसाद राठोड, गजान चिद्रवार, कुंडलिक चाव्हाण, परसराम अढाव, आदिनाथ चव्हाण, परसराम जाधव उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी २०१८ पासून कृषिपंपाच्या जोडणीसाठी डीमांड नोट भरली आहे. उद्योजकांना तत्काळ वीजपुरवठा करणाऱ्या सरकारकडून शेतकऱ्यांना मात्र ताटकळत ठेवण्यात आले आहे. कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची या माध्यमातून सरकारने थट्टा चालवल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. प्रलंबित वीज जोडण्या, विजेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील जाधव यांनी दिला आहे.

उन्हाचा कांदा पिकावर परिणाम
यंदा मार्चपासून उन्हाची तीव्रता अधिक आहे. मध्यंतरी हवामान विभागानेही उन्हाची लाट असल्याने काळजी घेण्याचे आवाहन केले होते. या तीव्र उन्हाचा कांदा पिकांवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. उन्हामुळे कांदा पात दहा ते बारा दिवस आधीच वाळली आणि कांदा पोसण्यावरही परिणाम झाल्याचा काही शेतकऱ्यांना अनुभव आला आहे. त्यामुळे यंदा उत्पादन कमी होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नगर, नाशिक, बीड, सोलापूर, औरंगाबाद, पुणे आणि अन्य काही भागांत कांद्याची मोठ्या प्रमाणात यंदा लागवड झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा चाळीस ते पन्नास टक्के कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. बियाण्यांत फसवणूक व त्यामुळे झालेले नुकसान, दरात चढ-उतार यांसारख्या अडचणी झालेल्या असतानाही नगर जिल्ह्यात यंदा केवळ रब्बी व उन्हाळी कांद्याची २ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मार्च महिन्यात उन्हाची लाट होती. अजूनही उन्हाचा कडाका आहे. त्याचा परिणाम म्हणून आपोआप कांदा पात वाळली आणि नेहमीपेक्षा दहा दिवस आधीच कांदा काढणीला आला. त्यामुळे कांदा पोसण्यावर परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचे बोललो जात आहे.

हे देखील वाचा