मुंबई : संपूर्ण जगात मलेरियामुळे दरवर्षी लाखों लोकांचा मृत्यू होतो. मलेरिया विरोधी औषधी करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ दररोज नवनवीन प्रयोग करत आहेत. आता या प्रयत्नांमध्ये भारतातील शेतकर्यांनी मोठी जबाबदारी उचलली आहे. मलेरियाविरोधी वनस्पती आर्टेमिसियाचे उत्तर प्रदेशात उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागने नियोजन सुरु केले असून कंत्राटी शेतीसाठी नवीन धोरणाचा मसुदा तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. यानुसार या औषधी वनस्पती लागवडीचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
आर्टेमिसिया नावाच्या वनस्पतीमध्ये आर्टेमिसिनिन नावाचे घटक असते, ज्यापासून मलेरियाचे औषध तयार केले जाते. आर्टेमिसिनिन मलेरियाला कारणीभूत ठरणार्या प्लाझमोडियम फाल्सीपेरम या जंतूचा नाश करते. ही वनस्पती सामान्यतः चीनमध्ये आढळते. तेथून भारतात आणून नवीन प्रजाती तयार केली जात आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमॅटिक प्लांट्स (CIMAP) आणि बनारस हिंदू विद्यापीठासह अनेक संस्थांनी यावर प्रयोग केले आहेत.
या नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी उत्तर प्रदेशने पुढाकार घेत CIMAP CIM संजीवनी या आर्टेमिसियाच्या नवीन प्रजातीसाठी चेन्नईस्थित कंपनीशी करार केला आहे. यामुळे लवकरच कंत्राटी शेती उत्तर प्रदेशसह देशभर सुरू होणार आहे. यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत. यामुळे एकीकडे मलेरियाचे औषध बनवण्यासाठी कच्चा माल विदेशातून आयात करावा लागणार नाही, तर दुसरीकडे शेतकर्यांनाही फायदा होणार आहे.
या प्रजातीमध्ये मेंदुज्वराबरोबरच कर्करोगासह इतर आजारांवर औषधे बनवण्यासाठी वापरण्यात येणारे घटक जास्त आहेत. त्यातून अन्न गोळ्या आणि इंजेक्शन्स तयार केली जातात. जर्नल ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमॅटिक प्लांट सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की सीआयएम-संजीवनी शेतकर्यांसाठी आणि शेती उद्योगासाठीही फायदेशीर आहे.
आर्टेमिसियाच्या लागवडीपासून सुमारे चार महिन्यांच्या कालावधीत शेतकर्यांना हेक्टरी ६५ हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो, असेही अहवालात सांगण्यात आले. यामुळेच भारतीय कंपन्या या प्लांटसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंक करण्यासाठी पुढे येत आहेत. चेन्नईस्थित कंपनी सत्त्व वैद नेचर्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडने आठवड्यापूर्वी CIMAP सोबत करार केला आहे. कंपनी आर्टेमिसियाची कंत्राटी शेती करणार आहे.