नाशिक : डिसेंबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना बसला आहे. द्राक्षांची तोडणी तर १० दिवसांवर आली असतानाच अवकाळीने घात केला. यामुळे नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षबागांचे तब्बल ३ हजार कोटींचे नुकसान झाले असा अंदाज आहे. उत्पादनात थेट ५० टक्क्यांनक्क घट झाली आहे. यामुळे यंदा द्राक्षाचे उत्पादन तर घटणार आहे. परिणामी, द्राक्षांचेदेखील दर वाढणार आहेत. फेब्रुवारीला आवक सुरु होताच दर हे चढेच राहणार आहेत. उत्पादन घटल्यामुळे निर्यातीचे दर वाढणार आहेत. निर्यातीच्या वाढत्या दराचा परिणाम देशातील स्थानिक बाजारपेठेवरही होणार आहे.
द्राक्ष बागांना केवळ रोगराईचा प्रादुर्भाव झाला म्हणूनच नाही तर वर्षभर विविध फवारण्या कराव्या लागतात. याकरिता योग्य नियोजन असले तर हे पिक शेतकर्यांच्या पदरात पडते. मात्र, निसर्गापुढे शेतकरीही हतबल झाला आहे. अवकाळी पाऊस व वार्यामुळे द्राक्षांची पडझड झाली आहे. त्यामुळे घडकुज, मनीगळ, फुलोर्याचे नुकसान झाले आहे. मनीगळ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता मोठ्या साईजचा बेदाणा तयार होणार आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन हे कमी होईल पण निर्यातीवर परिणाम होऊ दिला जाणार नाही.