तब्बल १ एकरमध्ये विहीर; २ कोटींचा खर्च अन् १० कोटी लिटर पाणी; वाचा काय आहे शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग

- Advertisement -

बीड : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आडवा बोअर, उभा बोअर, टँकरचे पाणीपुरवठा, शेततळे, पाईपलाईनने पाणी असे अनेक प्रयोग बहुतांश शेतकरी करतात. मात्र जर तुम्हाला सांगितले की तब्बल २ कोटी रुपये खर्च करुन १ एकरामध्ये ८० मजूर, १२ हायवा, ८ जेसीबींचा वापर करुन एक विहिर खोदण्यात आली आहे. तर कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. मात्र हे अचाट काम बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीच्या मारोतीराव बजगुडे यांनी करुन दाखविले आहे.

१० कोटी लिटर पाण्याची साठवणूक

मारोतीराव नारायण बजगुडे यांची १२ एकर शेती आहे. सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल अशी काही तरी योजना आखण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी शेततळ्याचाही विचार केला मात्र त्याला मर्यादा असल्याने त्यांनी एक एकरात विहीर करण्याचे ठरविले. एक एकरातील विहीरीचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल तीन वर्षाचा कालावधी लागला. प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांनी परस खोली आणि एक एकराचा परिघ असलेली विहीर तयार केली आहे. याकरिता बजगुडे यांना २ कोटींचा खर्च आला असून या विहीरीमध्ये १० कोटी लिटर पाण्याची साठवणूक होत आहे.

८ एकरात मोसंबी आणि विहीरीत मासे

या आवढव्य विहीरीमध्ये दोन बोअर घेण्यात आले असून दोन परस खोल्या गेल्यानंतर पाषाण लागला होता. जिलेटिंग सहाय्याने तो फोडून विहीर साडेपाच परस खोल घेण्यात आली. दोन वर्षे पाऊस पडला नाही तरीही या विहीरीतील पाण्यातून ५० एकर जमिनीचे सिंचन होवू शकते. त्यामुळे उत्पादनाचे योग्य नियोजन केले असून ८ एकरमध्ये मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहीरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

हे देखील वाचा