नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यांत मान्सून दाखल झाला असून मान्सूनच्या पावसासोबतच तापमानातही घट नोंदवली जात आहे. दरम्यान, मान्सूनचा पहिला महिना म्हणजेच जून संपला असून या संपूर्ण महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा ८ टक्के कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
आकडेवारीनुसार, जून महिन्यातील सर्वात कमी पाऊस मध्य भारतात झाला असून, तेथे सरासरीपेक्षा 30 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर दक्षिण आणि प्रायद्वीप भारतात सामान्यपेक्षा 14 टक्के कमी, तर उत्तर पश्चिम भारतात जूनमध्ये सामान्यपेक्षा 12 टक्के कमी पाऊस झाला आहे.IMD नुसार, मध्य भारतातील कापूस, सोयाबीन आणि ऊस उत्पादक राज्यांमध्ये जूनमध्ये सरासरीपेक्षा 54 टक्के कमी पाऊस झाला आहे.
जुलैमध्ये मान्सूनचा पावसाबद्दल अंदाज?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2022 मध्ये संपूर्ण देशात पाऊस सामान्य असेल. IMD च्या मते, जुलैमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 94 ते 106 टक्के पाऊस पडेल.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील काही भाग, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पातील बहुतांश भागात सामान्य किंवा त्याहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारताच्या बहुतेक भागांमध्ये आणि पूर्व मध्य भारताच्या लगतच्या भागात आणि पश्चिम दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग येतो. यात जुलै महिना भात पिकाच्या लागवडीसाठी महत्त्वाचा आहे. जुलैमध्ये सरासरीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.