मुंबई : नेदरलँड सरकारने २०३० पर्यंत नायट्रोजन ऑक्साईड आणि अमोनियाचे उत्सर्जन ५० टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे. त्यासाठी नवं शेती धोरण जाहीर केलं आहे. देशाची माती, हवा आणि पाण्याची गुणवत्ता सुधारणं, ही या धोरणाची मुख्य उद्दिष्टं आहेत. या धोरणामुळे शेती आणि पशुसंवर्धनला मर्यादा येण्याची भीती आहे. नायट्रोजनयुक्त खतांचा वापर बंद करावा लागेल. अन्यथा त्या शेतकर्यांची शेतजमीन सरकारजमा केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकर्यांना पारंपरिक शेती सोडून पर्यायी, विविध प्रकारची, कमी प्रदूषणाची शेती करावी लागणार असल्याचे नवीन नियमांमध्ये म्हटलं आहे. सरकारच्या या धोरणांविरोधात हजारो शेतकरी रस्त्यांवर उतरले आहेत.
नेदरलँडच्या सरकारने अलीकडेच कृषी क्षेत्रातून नायट्रोजन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. शेतकर्यांनी शेतात नत्रयुक्त खतांचा वापर करू नये, असे आदेश शासनाने दिले. मात्र याचा परिणाम शेती आणि पशुपालन या दोन्हींवर होईल, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. सरकारच्या आदेशामुळे संतप्त शेतकर्यांनी विमानतळ बंद केले आहे. त्यांनी पोलिस लाइन्सची तोडफोड केली आणि ट्रॅक्टरने रस्ते अडवले आहेत. नेदरलँडपासून सुरू झालेली शेतकरी चळवळीची लाट जर्मनी, इटली, स्पेन आणि पोलंडपर्यंत पोहोचली आहे. या देशांचे शेतकरीही नेदरलँडच्या शेतकर्यांना पाठिंबा देत आहेत.
प्राण्यांच्या मूत्र आणि विष्ठेमुळे अमोनिया वायू तयार होतो असे सरकारचे म्हणणे आहे. अमोनिया उत्सर्जन कमी करण्याच्या हेतूने मागच्या काही वर्षांपूर्वी नेदरलँड सरकारनं शेतकर्यांना त्यांच्या दुभत्या जनावरांसाठी कमी प्रथिने असलेलं खाद्य वापरण्यास सांगतिले आहे. उत्सर्जन कमी करायचं असेल तर पशुधन संगोपन अर्ध्यावर आणण्यात यावं अशी सूचना मांडण्यात आली आहे. नव्या धोरणामुळे अमोनिया प्रदूषणासाठी जबर दंड ठोठावला जाणार आहे. खतांच्या वापरावरही निर्बंध येणार आहेत. त्यामुळे पीकपध्दतीच बदलावी लागणार आहे.
नायट्रोजनयुक्त खते म्हणजे काय?
वनस्पतींना लागणारा नायट्रोजन त्या जमिनीतून घेतात. हवेतील नायट्रोजन त्यांना तसाच घेता येत नाही म्हणून नायट्रोजन हा नेहमी ‘अमोनियम’, ‘नायट्रेट’ इ. स्वरूपांत द्यावा लागतो. अशा खतांची उपयुक्तता त्यांत असणार्या नायट्रोजनावर अवलंबून असल्यामुळे त्यांचा दर्जा व उत्पादन नायट्रोजनामध्ये व्यक्त करण्याची प्रथा आहे. अशा खतांत इतर काही पोषक द्रव्येही आढळतात. अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम-अमोनियम नायट्रेट, अमोनियम-सल्फेट-नायट्रेट, यूरिया, कॅल्शियम सायनामाइड, अमोनियम क्लोराईड (नवसागर) इ.संयुगे किंवा द्रवरूप अमोनिया यांचा उपयोग खत म्हणून केला जातो.