पुणे : बटाट्याचे पीक जमीनीच्या आत घेतले जाते हे सर्वांना माहित आहे मात्र आता जमीनीच्या वरही बटाट्याचे पीक घेता येणे शक्य आहे, असे कुणी म्हटल्यास त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र एरोपोनिक या नवीन तंत्रज्ञानामुळे हे शक्य होणार आहे. मध्य प्रदेश सरकारने नुकताच नवी दिल्लीतील केंद्रीय बटाटा संशोधन संस्था, शिमला या संस्थेशी अॅरोपोनिक पद्धतीने विषाणूजन्य आजारविरहित बटाटा बियाणे तयार करण्याचा करार केला. भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत येणार्या या संस्थेने बटाट्याच्या बिया हवेत तयार करण्याचे हे अनोखे तंत्र विकसित केले आहे.
मध्य प्रदेश हा भारतातील बटाट्याचा सहावा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. आता या नव्या तंत्रज्ञानाने बटाटा उत्पादनात भर पडणार आहे. शिवाय यावर रोगराईचा प्रादुर्भाव देखील नसेल, हे विशेष! बटाटा उत्पादनात एरोपोनिक तंत्रज्ञानामुळे देशातील अनेक भागातील शेतकर्यांना बटाट्याची उपलब्धता उपलब्ध झाली आहे.
एरोपोनिक तंत्रज्ञानात नेमके आहे तरी काय?
एरोपोनिक तंत्राद्वारे पोषक द्रव्यांची फवारणी अचूक पद्धतीने मुळांमध्ये केली जाते. वनस्पतीचा वरचा भाग मोकळ्या हवेत व प्रकाशात राहतो. एका वनस्पतीपासून सरासरी ३६-६० मिनीकंद मिळतात. शिवाय या पध्दतीमध्ये मातीचा वापरच होत नाही. जमिनीशी संबंध न आल्याने त्याच्या संबंधित जे रोग आहेत ते उद्भवत नाहीत आणि पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत एरोपोनिक प्रणालीमुळे ब्रीडर बीच्या वाढीमध्ये दोन वर्षे बचत होते. ८ राज्यांमधील २० कंपन्यांसह बटाटा बियाणे उपलब्धतेसाठी या तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण केले गेले आहे.