नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. आताही त्यांनी शेतकर्यांना एक रोखठोक सल्ला दिल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. शेती उत्पादन आणि बाजारपेठ याबाबत नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी सरकारच्या भरवश्यावर राहू नका, असे ते म्हणाले. सरकारकडून शेतीमालाला हमीभाव मिळेल आणि मग मालाचे दर वाढतील यावर अवलंबून न राहता उत्पादन वाढीबरोबर बाजारपेठ शोधण्यावरही लक्ष असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
शेतकरी आता उत्पादन वाढीवर भर देत आहे, पण मार्केटचे काय? त्यामुळे मार्केटही येथेच आहे त्याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या सेंद्रिय शेतीमालाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवून उत्पन्नही वाढवा असा सल्ला त्यांनी दिला. शेतकर्यांनी कुणाच्याही भरवश्यावर राहू नये. शेतीमालाचा दर आपोआप वाढणार नाहीतर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. आणि जर असे झाले नाहीतर नुकसान सरकारचे नाही तर तुमचेच होणार असल्याचे ते म्हणाले.
रासायनिक पद्धतीचा अवलंब करुन पिकवलेला शेतीमाल हा आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या मालाची चवही वेगळीच असते. काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या मालाला मागणी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी सेंद्रीय शेती ही अंमलात आणणे गरजेचे आहे. उत्पादनवाढीच्या नादात शेतीमालाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही ते म्हणाले.