नागपूर : जुलै महिना उजाडल्यापासून पावसाचा कहर सुरु आहे. यामुळे शेती पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण शेत जमिनही खरडून गेल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. कृषी विभागाच्या हवाल्यानुसार नागपूर विभागातील तब्बल २ लाख हेक्टर क्षेत्रफळाचे नुकसान झाले आहे. तर ३५० हेक्टर जमीनी वाहून गेल्या आहेत. यामुळे शेतकर्यांचे भरुन न निघणारे नुकसान झाले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान यामध्ये झाले आहे. राज्यातील तब्बल ९ लाख हेक्टर क्षेत्रफळाचे नुकसान झाल्याचा अहवालच कृषी विभागाने सादर केला आहे. अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. शिवाय ऑगस्टमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे यंदा खरिप हंगामातून फारसे काही हाती लागण्याची शक्यता वाटत नाही.
विदर्भात भात पिकाचे आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या विदर्भात पीक पाहणी आणि पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हा प्राथमिक अंदाज असून यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. आतापर्यंत २ लाख हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांच्या नुकसानीचा अहवाल आहे तर ३५० हेक्टर जमीन खरडून गेली आहे. यामुळे पंचानामे कशाचे करायचे? असा मोठा प्रश्न आहे.