परभणी : बाजारसमितीमध्ये शेंगदाण्याची खरेदी-विक्री होत असते. मात्र भुईमूगाच्या शेंगांना बाजारसमितीमध्ये स्थान मिळत नाही. परिणामी शेतकरी आणि ग्राहकांना शेंगांसाठी वणवण भटकावे लागते. आता परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावाच्या माध्यमातून भुईमूगांच्या शेंगाची खरेदीला सुरवात झाली आहे.
परभणी बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात भुईमूगाची लागवड झाली आहे. सबंध हंगामात उन्हाळी पिकांसाठी पोषक वातावरण राहिले असले तरी अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. भुईमूगाच्या शेंगा तर पोसल्याच गेल्या नाहीत. मात्र आता बाजार समितीच्या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सोमवारपासून जाहिर लिलावात भुईमूगाच्या शेंगाची खरेदी सुरु झाली असून शेतकर्यांनी स्वच्छ शेंगा बाजारात आणल्या तर त्यानुसार चांगला दर मिळणार आहे. शेतकर्यांच्या शेतीमालाला अधिकाअधिक दर मिळावा हाच बाजार समित्यांचा उद्देश आहे. त्यानुसार हा अभिनव उपक्रम असून याला देखील शेतकर्यांचा प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास व्यापार्यांनी व्यक्त केला आहे.
मार्केट यार्डावर जाहीर लिलावाद्वारे भुईमूग शेंगाची खरेदी करण्याची व्यापार्यांची इच्छा होती. त्यानुसार आडत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोतीलाल जैन यांनी याबाबत बाजार समिती प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार सोमवारपासून लिलावास सुरवात झाली आहे.