औरंगाबाद : खरिपाची पेरणी होताच राज्यात पावसाने हजेरी लावली होती. सरासरीपेक्षा अधिक तर पाऊस झाला पण सलग २० दिवस पावसाची संततधार सुरुच होती. यामुळे अनेक ठिकाणी जमीन खरडल्या गेल्या आहेत तर बहुतांश ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. अति पावसामुळे पिकं सडू लागली आहेत. शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातच सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे या खरिपातील सर्वच पिकांवर किड-रोगराईचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
शेतात सर्वत्र पाणी साचल्याने सोयाबीनसह तुरीचे पीक धोक्यात सापडले आहे. सोयाबीनवर शंकू गोगलगाय तर तुरीला मर रोगाने घेरले आहे. यामुळे पिके जोपासावी कशी असा एकच प्रश्न शेतकर्यांना भेडसावत आहे. एकूणच या सर्व समस्यांमुळे उत्पन्नात मोठी घट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकर्यांनी महागडी बियाणे अन् खत खरेदी करुन यंदाची पेरणी केली आहे. असे असताना पिकांची उगवण होताच नुकसानीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत पावसाचे थैमान आणि आता कीड-रोगराईचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकर्यांवरील आर्थिक भारही वाढत आहे.
शेतकर्यांना हा आहे सल्ला
शेतकर्यांनी पिकांना वाचविण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. सोयाबीनवर शंकू गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकर्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी गोगलगायींना साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात ७ ते ८ मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावे लागणार आहेत.