मुंबई : पीएम किसान निधीच्या दोन हजार रुपयांच्या १२व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. प्राप्त माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हा हप्ता जारी करतील. दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी देशातील शेतकर्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी अंदाजे २० हजार कोटी रुपये १० कोटींहून अधिक शेतकर्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित होतील असा अंदाज आहे.
पीएम किसान सन्मान निधीतून देशातील ११.३० कोटी शेतकर्यांना ११ हप्त्यांमध्ये एकूण २.१० लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. यावेळी हप्ता जारी करण्यापूर्वी, कृषी मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना शेतकर्यांची पात्रता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यांचे बँक खाते, आधार क्रमांक, जमिनीचे डिजिटल तपशील विहित मानकांची पूर्तता करणार नाहीत, त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो.