पुणे : राज्यात तब्बल १ लाख ७१ हजार हेक्टरवर डाळिंबाचे क्षेत्र आहे. उत्पदनासाठी डाळिंब पीक सोपे असले तरी वाढत्या कीड आणि रोगराईमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. डाळिंबावर पडणार्या पीन होल बोरर या रोगावर तर औषधच नाही. शिवाय यंदा या पीन होल बोररचा अधिक प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांनी बागांचीच मोडणी केली आहे. बागा बहरात येताच पीन होल बोरर, रसशोषक कीड, सूत्रकृमी, फळकूज अशा समस्या निर्माण होतात.
राज्यात पुणे, नगर, नाशिक, सांगली या भागात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. मात्र, उत्पादनाचा भरवसा नसल्याने क्षेत्रात घट होत आहे. यासंदर्भात कृषी विभागानेच राज्यातील डाळिंब बागांचा आढावा घेऊन एक विशेष मोहीम राबवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कृषितज्ञ आणि कृषी अधिकारी हे थेट शेतकर्यांच्या बांधावर येऊन पाहणी करुन योग्य मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राष्ट्रीय संशोधन केंद्रे, विद्यापीठे, डाळिंब उत्पादक संघ आणि कृषी विभाग सयुक्त कामे करणार आहेत. जिल्हानिहाय मोहीमांचे आयोजन करुन शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकर्यांपर्यंत कीड-रोगराई व्यवस्थापनाची यंत्रे पुरवली जाणार आहेत.
अशी घ्या काळजी
शेतकर्यांनी डाळिंबाची अतिघन लागवड करायची नाही. लागवड करताना ४.५ मीटर बाय ३ मीटर तर पाच बाय पाच मीटर दोन रांगामध्ये अंतर ठेवावे लागणार आहे. कीडनियंत्रणासाठी ड्रेचिंगचा वापर करता येणार नाही. याशिवाय कुजलेले कंपोस्ट खत व जैविक कीडनाशकांचा वापर वाढवावा लागणार आहे.
हे देखील वाचा :