नाशिक : थंडीच्या दिवसांमध्ये पालक या पालेभाजीची लागवड करणे फायदेशिर मानले जाते. पालक हे कमी दिवसात तयार होणारे हिवाळी पीक असल्यामुळे या दिवसांमध्ये पालकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पालकाच्या भाजीत अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच प्रोटीन्स आणि कॅल्शियम, लोह, फॉस्फरस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे या भाजीला मोठी मागणी असते. यामुळे पालक लागवडीतून शेतकरी मोठा नफा कमवू शकतात.
थंड हवामानात पालकचे उत्पादन जास्त येऊन दर्जा चांगला राहतो तर तापमान वाढल्यास पीक लवकर फुलोर्यावर येते आणि दर्जा खालावतो. पालकाचे पीक बिविध प्रकाराच्या जमिनीत घेता येते. खारबट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. तसेच हलक्या जमिनीत पीक चांगले येते. ज्या खारबट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत, तेथे पालक घेता येते. ऑलग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरित, या उन्नत जाती मानल्या जातात.
पालक लागवड पध्दती
पालक हे कमी दिवसात तयार होणारे पीक असल्यामुळे जमिनीच्या मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करुन बी फेकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्यास बाफसा आल्यावर पेरणी करावी. बी ओळीत पेरताना दोन ओळीत २५ ते ३० सें.मी. अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्यास पिकाची बाढ कमजोर होऊन पानांचा आकार लहान राहतो आणि पिकाचा दर्जा खालावतो. लागवडीपूर्वी बियाण्याला थायरम या बुरशीनाशकाची २ ग्रॅम दर किलो बियाण्याला या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्यामुळे मर रोगाला प्रतिबंध होतो. पालकाच्या एक हेक्टर लागवडीसाठी २५ ते ३० किलो बियाणे लागते.
खते आणि पाणी व्यवस्थापन
पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करुन जमिनीत ओलावा राखणे आवश्यक आहे. बिजोत्पादनासाठी पालक बियाणे पेरणीनंतर पालकांच्या पानांची २ ते ३ तोडणी करणे आवश्यक आहे. पानांच्या तोडणीमुळे झाडांची चांगली वाढ होवून बियाण्यांचे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. बी पेरणीपासून जवळ जवळ १५० ते १८० दिवसात बियाण्याचे पिक काढणीस तयार होते.
सरासरी जातीनिहाय हेक्टरी ६००० ते ८००० किलो बियाणे उत्पादन मिळू शकते.