गोंदिया : पणन हंगाम २०२१-२२ मध्ये पणन विभाग व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात ४४ लाख १० हजार क्विंटल धान खरेदी झाली असून १३.३५ लाख क्विंटल भरडाई झाली आहे. भरडाई प्रक्रिया अधिक गतिमान करून उर्वरित धानाची भरडाई तातडीने करावी असे निर्देश राज्यमंत्री नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेई, सहायक जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने, व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ सोपान सांभरे, खरेदी अधिकारी लीना फलके, सहायक पुरवठा अधिकारी तथा तहसीलदार गोंदिया धनंजय देशमुख व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खरीप पणन हंगाम २०२१-२२ अंतर्गत पणन विभाग व आदिवासी विभागाच्या १५१ धान खरेदी केंद्रावर १ लाख ५४ हजार १९ शेतकऱ्यांकडून ४४ लाख १० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आला. याची किंमत ८५५ कोटी ६६ लाख ६७ हजार ८६८ एवढी आहे. यापैकी १ लाख ५३ हजार ४८९ शेतकऱ्यांना ८४७ कोटी ४२ लाख ५६ हजार ४०३ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. केवळ ५३० शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित आहेत. तेही तातडीने देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
खरीप पणन हंगाम २०२१-२२ अंतर्गत भरडाईसाठी पणन विभागाने ३२३ व आदिवासी विभागाने २८६ मिलर्स सोबत करारनामे केले असून अभिकर्ता संस्थेने पणन विभागाची ९.४८ लाख क्विंटल व आदिवासी विकास महामंडळाची ३.८८ लाख क्विंटल भरडाई केली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सवाई यांनी दिली.
धान साठविण्यासाठी जिल्ह्यात गोदमाची कमतरता असून आवश्यकतेप्रमाणे खासगी गोदाम भाड्यावर घेतली जातात. सद्यस्थितीत ९१ हजार ७५६ मेट्रिक टन गोदाम क्षमता आहे. धानाची खरेदी झाल्यावर वेळेत भरडाई न झाल्यास पुढील हंगामात साठवणुकीसाठी गोदामे उपलब्ध होत नसल्याने भरडाईस प्राधान्य देण्यात येते असे त्यांनी सांगितले.
असंख्य शेतकरी एकाच प्रकारच्या धानाचे उत्पादन घेत असल्याने जमिनीचा कस व तांदुळाच्या वाणांची संख्या कमी होत आहे. हे टाळण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्रावर एफएक्यू दराचे धान येईल अशा धानांच्या जाती कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महाबीज किंवा इतर खाजगी कृषी केंद्राकडून उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी घेतला ऊर्जा विभागाचा आढावा
शेतीचे वीज कनेक्शन असणाऱ्या व वारंवार बंद पडणाऱ्या रोहित्राची यादी तयार करून अशा रोहित्राच्या क्षमता वृद्धीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
कृषी जोडण्या, वीज पुरवठा, रोहित्रावरील अतिरिक्त भार, भविष्यातील भारनियमन, रोहित्राची देखभाल दुरुस्ती आदी विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विजेची अचानक कमतरता निर्माण झाली असून येणाऱ्या काळात भारनियमन करावे लागणार आहे. याचा ग्राहक व नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. ही परिस्थिती संयमाने हाताळण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. भारनियमनाच्या वेळापत्रकाची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीज देयकांबाबत सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात मेळावे घेऊन शेतकऱ्यांचे वीज देयक दुरुस्ती करून देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.