मुंबई : ऑगस्ट महिन्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढचे ३ ते ४ दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचा काही भाग सोडला तर बहुतांश भागात पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. अशातच पावसाच्या पुनरागमनाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ३ आणि ४ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रात वादळी वार्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा इशारा आहे.
अमरावती, भंडारदरा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ४ आणि ५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदाबाद, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भात पावसाने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. दरम्यान हवामान विभागाकडून या आणि पुढच्या महिन्याच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही महिन्यात समाधान सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कोकणात सर्वसाधारण, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर सरासरीपेक्षा जास्त राहील, राहणार आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन महिन्यांत देशभरात सामान्य पाऊस पडेल. ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता असून पश्चिम मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य, पूर्वेत्तर भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतीय राज्यात मात्र उर्वरित राज्यापेक्षा अतिवृष्टी होईल. कोकणासकह कोल्हापूरला (३, ४ ऑगस्ट) यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पंजाबराव डख यांचा अंदाज
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते या दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बघायला मिळणार आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनीही वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, २ व ३ ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, परभणी, बीड, नांदेड तसेच विदर्भातील यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
शेतकरी पुन्हा धास्तावला
गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतीकामांना वेग आलाय. सतत पाऊस सुरू असल्यानं शेती कामं थांबली होती. पावसाने विश्रांती घेतल्यानं शेतकरी मोठ्या जोमाने कामाला लागलेत. पिकांवर औषध फवारणी, कोळपणीचे कामे सध्या शेतात सुरु आहेत. मात्र आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकर्यांची धाकधूक वाढली आहे. कारण अजूनही अनेक भागामध्ये शेतात पाण्याचा ओलावा कायम आहे. अती पावसामुळे काही ठिकाणी पिकं पिवळी पडली आहेत. सध्या पावसाने उघडदीप दिली असल्याने किमान शेतातील कामे तरी करता येत आहेत. सर्वात मोठी डोकंदूखी असलेल्या तण काढणीचेही काम सुरु आहे. मात्र पुन्हा पावसाने आगमन केल्यास या कामांमध्ये खंड पडण्याची भीती वाटत आहेत