अश्विनी औरंगाबादकर, प्रगतशील शेतकरी , कळमेश्वर , जि . नागपूर
नागपूर : शेती तर घेतली, पण अनुभव शून्य होता, वखर, डवरा, निंदण, बांध, शेला, तास, आड तास, म्होरके, चर्हाट, तिफण, सरते, सारण्या हे आणि असे असंख्य शब्द माझ्या शब्दकोशात नव्हतेच, त्यामुळे माझ्याकडे काम करणाऱ्यांच्या मते मी अगदीच अज्ञानी होते. मी परत परत विचारायचे तो काम करणारा माणुस उलटे सुलटे बोलायचा मी नैसर्गिक पध्दतीने करण्याबद्दल बोलले की म्हणायाचा, ” तुम्ही आता आम्हाला शेती कशी करायची ते शिकवणार का ? मी लहानपणापासून शेती करतोय ” आवश्यक म्हणुन १ गाय व दोन बैल घेतले. जमेल तशी हट्टाने नैसर्गिक शेती करू लागले.
पण ना त्याच्या मनासारखी होत होती ना माझ्या कारण मी बाजारातून तयार खताची पोती आणून देत नव्हते व मी जे सांगीन ते तो पूर्ण करत नव्हता. मी दरवर्षी काहीतरी वेगवेगळे लावणे चालूच ठेवले. या ७ वर्षांच्या शेतीच्या अनुभवाने मला खूप समृध्द केले. शिक्षणाचे महत्त्व मला गावात येऊन कळले. पहिला धडा गिरवला शेतकरी शिकलेला असणे गरजेचे आहे . आवड असलेल्या शिकलेल्या लोकांनी शेती नक्की करावी. आजवर आपण असे बघत आलो आहोत की ज्यांच्याकडे शेती आहे त्यांची पण जी मुले शिकून शहरात जात नाहीत ती शेती करतात. दुसरे हे लक्षात आले की प्रत्येक गावात एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक पण सेंद्रिय शेती करत नाही.
सेंद्रिय शेतीबद्दल जर गावातल्या लोकांशी बोलायला गेलो तर त्यांची काही ऐकून किंवा समजून घेण्याची इच्छा नाही . गावातील सगळे शहरांकडे आकृष्ट होतात कारण आजही गावांमध्ये पूर्णवेळी वीज , रस्ते , दळणवळणाची सोय , दवाखाने यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. मेहनत करणाऱ्यांना काही किम्मत नाही . त्यामुळे पैसे पण फार मिळत नाही. शेती विकण्याकडे पण शेतकऱ्यांचा कल आहे. खरेतर लोकांचा ओघ गावाकडे वाढायला हवा आहे.
गावात राहून शेती आणि तीपण सेंद्रिय करणे ही काळाची गरज आहे. पण गावामधे शेतकऱ्यांना हे पटवणे किती अवघड आहे हे माझ्या लक्षात आले. शेतकरी रासायनिक खते व कीटक नाशक वापरून शेती करण्याच्या इतके आधीन झाले आहेत की त्यातून बाहेर पडण्याचा ते विचारही करत नाही . त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमचे पोट यावर अवलंबून नाही असे म्हणुन ते आपले म्हणणे ऐकून घ्यायला तयार नसतात, जे काही अंशी खरे आहे बरे रासायनिक शेती करून हे खूप पैसा कमावतात का तर तसेही नाही. व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणावर आहे. दुर्दैवाने गावांतून शिक्षणाचा दर्जा फारसा चांगला नाही.
शिकलेल्या लोकांनी शेती केली तर लोकांचा त्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो हा माझा अनुभव आहे. माझ्या पुरता विचार करायचा झाला तर माझ्या स्वयंपाक घरातील ८० % गरजा माझ्या शेतातून पुर्ण होतात . मला जे वाटते ते मी लावण्याचा प्रयत्न करते. हे लावु का , ते येइल का असे प्रश्न मला पडले नाही . काही गोष्टी गावातल्या लोकांनी कधी लावलेल्या किंवा बघितलेल्या नसतात त्यामुळे त्या कशा पध्दतीने लावायच्या , वापरण्यास योग्य करण्यासाठी काय करायचे हेही मी प्रयत्न आणि चुका करून शिकते . स्वतःच्या अनुभवावरून शिकत असल्याने अभ्यास चांगला होतो आणि नीट लक्षात पण राहतो. शिकणे चालू आहे आणि चालूच राहील. शेतात कंटुरिंग बांध केले.
मदतीला, मार्गदर्शन करायला खूप चांगले लोक टप्प्याटप्प्यावर भेटत गेले. शिवाय आपले गूगल भाऊ आहेतच. इच्छा असेल तर अशक्य असे काही नसते. मुलांना शालेय शिक्षणाबरोबर शेती हा विषय सक्तीचा असावा जेणेकरून शहरी मुलांना त्याबद्दल इतके अज्ञान राहणार नाही . एक व्यवसाय पण असू शकेल . सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की शेती समृध्द असेल तर देश समृध्द होईल. ” शेतकरी जे पिकवतो त्याने लक्ष्मी वाढते , बाकी सर्व तर फक्त एक खिसा भरून दुसरा खिसा रिकामा होणे यापलीकडे काहीही नाही ” हे विनोबा भावे यांनी लिहीलेले शब्द तंतोतंत पटतात.
गेल्या ६ वर्षामधे जाणवलेल्या काही बाबी :
* नैसर्गिक जीवनशैली कडे वळण्यासाठी घरी कुणाला कॅन्सर किंवा असाध्य व्याधी होणे आवश्यक आहे का ?
* आपण असे जाणतो की ८० % रोग हे चुकीच्या खाण्याने , चुकीच्या जीवन पध्दतीमुळे होतात . असे असूनही चांगले असण्यापेक्षाही चांगले दिसणे हे सुशिक्षित लोकांना जास्त महत्त्वाचे वाटते .
* दवाखान्यांची संख्या वाढतेच आहे व ते ओसंडून वाहत आहेत याचा विचार करायला पाहिजे .
* वेळ नाही या सबबीखाली आपण आपल्या घरचे काय खातो काय पितो , ते योग्य आहे का हा विचार पण काही लोकांच्या मनाला शिवत नाही .
* सेंद्रीय शेती करणाऱ्यांना लोक विचारतात की कशावरून तुमचे सेंद्रिय आहे . पण बाजारातून कुठलेही भाजी , फळे , धान्य घेताना त्यावर किती रसायने मारली आहेत हे विचारत नाही .
* शेतीतून येणाऱ्या गोष्टी वापरणारा वर्ग जोपर्यंत सजग होत नाही तोपर्यंत हे होणे कठीण आहे .
* शेतमालाला चांगला भाव मिळणे हे ही अत्यंत गरजेचे आहे .
* शेती हा जसा एकमेव व्यवसाय आहे ज्यात विक्री किमती चा उत्पादन खर्चाशी काही संबंध नसतो .