अमरावती/नंदुरबार : गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने दमदार पुनरार्गमन केले आहे. मुंबईसह पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नाशिक आदी भागांमध्ये पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरु आहे. अमरावती जिल्ह्यात तर इतका मुसळधार पाऊस झाला की सावरखेडा परिसरातील पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या आहे. राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी नंदुरबारकरांना मात्र अपेक्षित पावसाची प्रतिक्षा आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा तर कोरडा गेलाच आहे पण दुसर्या आठवड्यातही पावसाने दडी दिली आहे. जिल्ह्यात ७७ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला नसल्याने केवळ ३५ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. ज्या शेतकर्यांनी धूळपेरणी केली त्या क्षेत्रावरील पिकेही धोक्यात आले आहेत. यामुळे अमरावती व नंदुरबार या दोन्ही ठिकाणी शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
उत्पादन आणि उत्पन्न या दोन्हीच्या अनुशंगाने खरीप हंगाम महत्वाचा असतो. यंदा पावसाने ओढ दिली तरी जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात शेतकर्यांनी पेरणीचे धाडस केले. धूळपेरणी करुन शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली नाहीतर दुबार पेरणी ही ठरलेलीच होती. पण गेल्या काही दिवसांपासून कुठे मुसळधार पाऊस तर कुठे बेपत्ता असलेला पाऊस यामुळे शेतकर्यांच्या समस्या कायम आहेत.
अमरावती जिल्ह्यातील सावरखेड येथे झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. दुबार पेरणी करायाची म्हटली तरी ज्या जमिनीवर पेरणी करायची जी जमिनच वाहून गेली आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला पावसाअभावी खरीप वाया जाणार अशी भीती होती तर आता अधिकच्या पावसाने खरीप वाया गेला आहे. संपूर्ण परिसरात पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. असे असताना शेतकर्यांना मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अगदी उलट चित्र आहे. जिल्ह्यात १० जूननंतर खरीप पेरणीला सुरवात होत असते. यंदा मात्र, १० जुलै उजाडत आला तरी केवळ ३५ टक्के क्षेत्रावरच खरीप पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत सरासरी एवढाही पेरा झालेला नाही. नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची ६५% ची तुट आहे. तर जुलै महिन्याचा पहिला आठवडाही काही अंशी कोरडा गेला असेच म्हणावे लागेल. जिल्ह्यातील कोणत्याही महसूल मंडळात ७७ मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्या नसल्याची नोंद आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यातच ज्या शेतकर्यांनी झालेल्या पावसावर पेरण्या आटोपल्या होत्या त्या शेतकर्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट ही उभे राहिले आहे.