मुंबई : बनावट बियाण्याची विक्री ही प्रत्येक हंगामात शेतकर्यांसाठी मोठी डोकंदुखी ठरत असते. यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. बनावट बियाण्यांपासून शेतकर्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागातर्फे अनेक उपक्रम राबविण्याचा दावा केला जात असला तरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बनावट बियाण्यांची विक्री झाली असल्याची धक्कादायक माहिती खुद्द केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी संसदेत दिली आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये बनावट बियाणांची विक्री झाल्याचे तोमर यांनी म्हटले आहे.
केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, २०१५-२०२२ मध्ये , महाराष्ट्रात ७,०९५ टन,तेलंगणात १.१७ लाख टन, आंध्र प्रदेशात २१,७२४ टन, कर्नाटकात १०,३४३ टन आणि गुजरातमध्ये २५२ टन बियाणे जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी महाराष्ट्रात २२३ लोकांना अटक करण्यात आली आहे. यावरुन लक्षात येते की, बनावट बियाण्याची समस्या किती गंभीर आहे.
महाराष्ट्रात बनावट बियाण्यांमुळे पिकांची उगवण न होणे, त्याची वाढ न होणे किंवा त्यातून उत्पन्न न मिळणे आदी प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकवेळा ऐनवेळी कळते की यातून उत्पादनच निघू शकत नाही. अशावेळी शेतकर्यांच्या हाती काहीच लागत नाही. यामुळे बनावट बियाण्यांवर निर्बंध आणणे आवश्यक आहे.