नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे आयोजित किसान सन्मान संमेलनात देशातील ३.३ लाख किरकोळ खत दुकानांचे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र मध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली. ही दुकाने टप्प्याटप्प्याने पीएमकेएसकेमध्ये बदलण्यात येतील. या केंद्रांवर केवळ खतच उपलब्ध होणार नाही, तर बियाणे, उपकरणे, माती परीक्षण आणि शेतकर्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ६०० नवीन पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन केले. ही केंद्रे वन स्टॉप शॉप म्हणून विकसित केली जाणार आहेत. सध्या खताची दुकाने उत्पादक कंपन्यांच्या डीलर नेटवर्कद्वारे चालविली जातात, परंतु तेथे शेतीशी संबंधित प्रत्येक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकर्यांना लागणारा माल घेण्यासाठी २-३ वेगवेगळ्या दुकानांच्या फेर्या माराव्या लागत आहेत. या कार्यक्रमादरम्यान शेतीशी संबंधित १५०० स्टार्टअप्स लाँच करण्यात आले. यासोबतच खताशी संबंधित ’इंडियन एज’ नावाचे ई-मासिकही सुरू करण्यात आले.