पुणे : वाईन विक्रीचे धोरण शेतकर्यांच्या हिताचे होते मात्र ते अंमलात आले नाही. यामुळे शेतकर्यांचेच जास्त नुकसान झाले आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्यावतीने आयोजित द्राक्ष परिषदेत बोलतांना व्यक्त केले. देशात द्राक्ष उत्पादनाच्या तुलनेत केवळ ८ टक्के द्राक्षांची निर्यात होते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी वाईन विक्रीचे धोरण महत्वाचे ठरले असते असेही पवार म्हणाले.
निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हा अडचणीतच आहे. गेल्या दोन वर्षापासून द्राक्ष हंगाम सुरु होण्यापूर्वीच अवकाळी पावसाची अवकृपा राहिलेली आहे. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी स्थिती आहे. या प्रतिकूल परस्थितीमुळे अनेक शेतकर्यांनी बागाही मोडीत काढल्या आहेत. आपल्या देशातून केवळ ८ टक्के द्राक्षाची निर्यात होते, तर ९२ टक्के द्राक्ष भारतीय बाजारपेठेत विक्री होतात. त्यामुळं स्थानिक बाजारपेठेत कशी मजबूत होईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे घटक हे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. शेतीचा ही ते भाग आहेत. त्यांच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती सुरुये. असे देशात जवळपास ५ हजार शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यामुळं विज्ञान आणि शेतीचा समतोल राखला गेला. वाईन विक्रीचं धोरण गेल्या राज्य सरकारने आणलं, हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही. प्रश्न खूप आहेत. यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे आश्वासन यांनी उपस्थित शेतकर्यांना दिले आहे.