सांगली : नंदुरबार येथील सारंगखेडा बाजार म्हटला की, लाखों रुपये किंमती असलेले घोडे डोळ्यासमोर येतात. मात्र एका मेंढीला चक्क सव्वा दोन लाख रुपयांची किंमत मिळाली आहे. हा विक्रम घडलाय सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता.जत) मधील शेळ्या आणि मेंढ्यांच्या बाजारात!
जत तालुक्यातील माडग्याळ येथील मय्याप्पा चौगुले या शेतकर्याने आपल्या सहा मेंढ्या विक्रीसाठी बाजारात आणल्या होत्या. सहा मेंढ्यांची तब्बल १४ लाख रुपयांना विक्री झाली. प्रत्येकी एका मेंढीला दोन लाख ३८ हजारांचा दर मिळाला.
माडग्याळचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार प्रसिद्ध आहे. देशभरातून लोक मेंढ्यांच्या खरेदीसाठी या बाजारात येत असतात. यंदा येथील बाजारात मेंढ्यांना विक्रमी किंमत मिळाल्याने हा बाजार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथील बाजारात एका मेंढीला दोन लाख ३८ हजारांचा दर मिळाल्याने आंनदीत झालेल्या शेतकर्याने मेंढ्यांची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
या मेंढीचे मांस प्रसिद्ध
माडग्याळ, मारवाडी, जैसलमेरी या मेंढ्यांच्या जाती मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. माडग्याळ ही मेंढी काटक असते. इतर मेंढ्यांच्या तुलनेत ही मेंढी अधिक रोगप्रतिकारक आहे. मागड्याळ नराचे वजन ४० ते ५० किलो तर मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असते. विशिष्ट चव आणि स्वाद असलेले या मेंढीचे मांस प्रसिद्ध आहे.