पुणे : कृषी क्षेत्रातही करिअर चांगले करिअर (Career News) होवू शकते, याचे महत्त्व आता विद्यार्थ्यांना कळू लागले आहे. यामुळे अॅग्रीकल्चर अभ्यासक्रमांकडे (Agricultural Studies) विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. कृषी क्षेत्रात डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. इंजिनिअरिंगसह अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या क्षेत्रात भविष्यात उत्तम संधी उपलब्ध आहेत. १२वी नंतर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बीएस्सी अॅग्री करावे का बीटेक (B.Tech) (अॅग्रीकल्चर इंजिनिअरिंग)? हा प्रश्न अनेक विद्यार्थी व पालकांना पडतो. यामुळे या दोन्ही अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
बीएस्सी अॅग्री (B.Sc Agri) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यात विद्यार्थ्यांना कृषी विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देण्यात येतो. या अभ्यासक्रमात शेतीची उत्पादकता कशी वाढवायची आणि शाश्वत पद्धतीने कृषी गुणवत्ता कशी सुधारायची, पर्यावरणपूरक आणि जैव-सुरक्षित पद्धतींचा वापर करून शेती कशी करावी हे शिकवले जाते. शेतीच्या मूलभूत गोष्टी शिकण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. स्पर्धा परीक्षा विशेषत: युपीएससीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी पदवी मिळविण्यासाठी बीएस्सी अॅग्रीला प्रथम प्राधान्य देतात. बीएस्सी पूर्ण केल्यानंतर अॅग्रीकल्चरमध्ये अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट कोर्स, अॅग्रीकल्चरमध्ये स्पेशलाइज्ड मास्टर ऑफ सायन्स (एमएससी) पदवी किंवा एमबीए करण्याचा पर्याय निवडता येतो.
बीटेक (कृषी अभियांत्रिकी), हा देखील चार वर्षांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम आहे, जो विद्यार्थ्यांना कृषी आणि अन्न उत्पादनामध्ये तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन वापरण्याची पद्धत शिकवतो. या कोर्समध्ये, सर्व काही शेतीमध्ये तंत्रज्ञान कसे वापरले जाते यावर फिरते. समाजाला सर्व सजीवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित कृषी प्रक्रिया आवश्यक आहे. बीटेक इंजिनअरिंगनंतर नॅशनल सीड कॉर्पोरेशन, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विविध राज्य फार्म कॉर्पोरेशन्स, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये नोकर्या मिळवण्यास मदत होते. ज्यांना तांत्रिक क्षेत्राऐवजी संशोधनात अधिक रस असेल तर कृषी विषयातील बीएससी हा योग्य पर्याय आहे.