शेतशिवार । जळगाव : सध्या ढगाळ हवामानामुळे आणि मधून मधून पडणार्या पावसामुळे केळीवर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, बुरशी, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. कसेबसे हाताशी आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत असल्याने शेतकऱ्यांना वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत येताना दिसत आहेत.
केळी करपा (सिगाटोक) रोग व्यवस्थापन
केळीवर येणार्या अनेक बुरशीजन्य रोगांपैकी करपा हा एक घातक तसेच उत्पन्नावर विपरीत परिणाम करणारा रोग आहे. इंग्रजीत या रोगास सिगाटोका लिप स्फॉट या नावाने संबोधले जाते. हा रोग मायकोस्पेरीला बुरसीमुळे होतो. केळीवरील करपा हा प्रामुख्याने तीन प्रकारचा सतो. पिवळा करपा, काळा करपा आणि नारंगी करपा, पिवळा हा मायकोस्पोरील म्युसीकोला या बुरशीमुळे होतो. तर नारंगी करपा हा मायोकोस्पोरील यूम्यूसी या बुरशीमुळे होतो तिन्ही प्रकारच्या करप्यांपैकी पिवळा करपा व नारंगी करपा ह्या रोगाची प्रादुर्भाव पीक वाढीच्या सर्व अवस्थेत आढळून येतो. करपा रोगामुळे एकुण उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होवून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी याची वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता असते.
रोगाची लक्षणे
या रोगाची सुरुवात खालच्या जुन्या पानांवर होते. प्रादुर्भावाच्या सुरुवातीस पानावर लहान लहान लांबट गोलाकार फिक्कट पिवळसर ठिपके व मध्य भागी काळसर ठिपके दिसुन येतात. तदनंतर पानाच्या उपशिरांच्या दरम्यान त्याचा आकार वाढत जावून पिवळ्या रेषेच्या स्वरूपात दिसतात. कालांतराने हे ठिपके मोठ्या ठिपक्यांमध्ये (१ ते २ मी.मी. पासून २ ते ३ सें.मी.) रुपांतरीत होतात. पूर्ण वाढ झालेल्या ठिपक्यांचा रंग तपकिरी काळपट असतो तर ठिपक्याभोवती पिवळसर रंगाची वलय दिसुन येते. करपा रोगाची ठिपके सर्वसाधारणपणे पानांच्या कडावर आणि शेंड्याकडील भागावर आढळून येतात. रोगास अनुकुल हवामान दिर्घकाळ टिकून राहिल्यास ठिपके एकमेकात मिसळून पाने टोकाकडून करपतात. जास्त प्रमाणात तिव्रता असल्यास संपूर्ण पान सुकते, एकुण कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. याचा विपरीत परिणाम केळी उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होतो.
प्रतिबंधात्मक उपाय
१. शिफारस केलेल्या (१.५ मी. द १.५ मी.) अंतरावरच केळी लागवड करावी.
२. कंद लागवडी पुर्वी १०० लीटर पाण्यात १५० ग्रॅम अॅसिफेट + १०० ग्रॅम कार्बेन्डझिम मिसळून केलेल्या द्रावणात कंद किमान अर्धा तास बडवून कंद प्रक्रिया करावी.
३. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. शिफारशीप्रमाणे पाण्याची मात्रा द्यावी.
४. पावसाळ्यात बागेत पाणी साचून न राहता योग्य तो निचरा होईल याकडे लक्ष द्यावे.
५. केळीबाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी.
६. शेत व बांध नेहमी तणुक्त आणि स्वच्छ ठेवावे.
७. माती परिक्षणानुसार तसेच दिलेल्या एकूण खताची कार्यक्षमता अधिकतम कशी मिळेल ह्या उद्देशाने पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. केळीस शिफारस केलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा (२०० ग्रॅम नत्र + ६० ग्रॅम स्फुरद + २०० ग्रॅम पालाश प्रति झाड) वेळापत्राकानुसार द्यावी. या सोबत प्रतिझाड १० किलो शेणखत + २५ ग्रॅम अऍझोस्पायरीलम व पीएसबीची मात्रा द्यावी.
८. नत्रयुक्त खतांचा अतिक्ति वापर टाळावा.
९. मुख्य खोडाच्या बाजुला येणारी पिले नियमितपणे कापावीत.
१०. रोगाची लागण दिसताच फक्त रोगग्रस्त पानाचा भाग किंवा संपुर्ण रोगग्रस्त पान त्वरीत कापून बागेबाहेर नेवून जाळून नष्ट करावे.
११. बागेत पिकाचे कोणतेही अवशेष ठेवू नयेत.
१२. पावसाळा सुरु होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मॅन्कोझेब (२५ ग्रॅम) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड (२५ ग्रॅम), कार्बेन्डेझिम (१० ग्रॅम) या बुरशीनाशकांची १० लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळुन आलटुन पालटून फवारणी करून घ्यावी.